महाराष्ट्र, कर्नाटक राज्याची प्रवासी वाहतूक व्यवस्था कोलमडली; प्रवाशांना फटका, कारण काय..वाचा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2025 12:21 IST2025-12-09T12:20:48+5:302025-12-09T12:21:53+5:30
कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी मराठी जनतेची माफी मागावी, अन्यथा..

महाराष्ट्र, कर्नाटक राज्याची प्रवासी वाहतूक व्यवस्था कोलमडली; प्रवाशांना फटका, कारण काय..वाचा
कोल्हापूर : बेळगावसह सीमा भागातील मराठी भाषिकांवर अन्याय, दडपशाहीचे कर्नाटक सरकारने धोरण राबविल्याच्या निषेधार्थ उद्धवसेनेने सोमवारी कर्नाटकची प्रवासी वाहतूक रोखली. त्यांच्या बसवर जय महाराष्ट्र असा फलक लावून कर्नाटक सरकारच्या विरोधात घोषणा दिल्या. या आंदोलनानेमहाराष्ट्र आणि कर्नाटक दोन्ही राज्याची वाहतूक व्यवस्था कोलमडली. त्याचा प्रवाशांना फटका बसला.
उद्धवसेनेतर्फे मध्यवर्ती बसस्थानकात सकाळी अकरा वाजता कर्नाटक सरकारच्या विरोधात निदर्शने केली. बसस्थानकात प्रवेश करणाऱ्या कर्नाटकच्या बस रोखून त्यातील प्रवाशांना खाली उतरविण्यात आले. त्या बसवर 'जय महाराष्ट्र' असा फलक लावून कर्नाटक सरकारच्या निषेधाच्या घोषणा दिल्या.
सहसंपर्क प्रमुख विजय देवणे म्हणाले, कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी मराठी जनतेची माफी मागावी, अन्यथा उद्या कर्नाटक सरकारमधील मंत्र्यांना अधिवेशन काळात महाराष्ट्रात फिरकू देणार नाही, असा इशारा दिला. तसेच विभाग नियंत्रक अभय देशमुख यांनी कर्नाटकची बस वाहतूक बंद करावी, अन्यथा पुन्हा आंदोलन करण्यात येईल.
उद्धवसेनेचे उपनेते संजय पवार यांचेही भाषण झाले. यावेळी अवधूत साळोखे, मंजीत माने, चंद्रकांत भोसले, अनिकेत घोटणे, दिनमहमंद शेख, संजय जाधव, संतोष रेडेकर, पंपू कोंडेकर, गोविंद वाघमारे आदी सहभागी झाले .
कर्नाटकची वाहतूक कोलमडली
आंतरराज्य करारानुसार कर्नाटकच्या १०० हून अधिक बसेस महाराष्ट्रात येतात. त्यामुळे मध्यवर्ती बसस्थानकातून निपाणी, संकेश्वर, हत्तरगी, बेळगाव, सौंदत्ती यासह सीमाभागातील वाहतूक कोलमडली. रात्री उशिरापर्यंत ही वाहतूक सुरू नव्हती.
महाराष्ट्राचीही वाहतूक बंद
महाराष्ट्राच्या एसटीही कोगनोळी टोल नाक्यापर्यंत धावल्या. दिवसभरात महाराष्ट्रातून कर्नाटक आणि सीमाभागात ५० हून अधिक बसेस धावतात. आंदोलनामुळे सीमाभागात अंतर्गत मार्गाने वाहतूक सुरु राहिली. मात्र राष्ट्रीय महामार्गावर कोगनोळी टोलनाक्याच्या पर्यंत महाराष्ट्राच्या एसटी धावल्या.