Kerala Floods: केरळच्या पुरात अडकलेल्या हत्तीच्या पिलाला जवानाने खांद्यावर उचललं?... हे आहे सत्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2018 12:07 IST2018-08-23T10:05:25+5:302018-08-23T12:07:14+5:30
केरळमध्ये पावसानं जनजीवन अक्षरशः विस्कळीत झालं आहे. अनेक ठिकाणी पुराच्या पाण्यात अडकून पडलेल्या माणसांना वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जातायत.

Kerala Floods: केरळच्या पुरात अडकलेल्या हत्तीच्या पिलाला जवानाने खांद्यावर उचललं?... हे आहे सत्य
तिरुअनंतपूरम- केरळमध्ये पावसानं जनजीवन अक्षरशः विस्कळीत झालं आहे. अनेक ठिकाणी पुराच्या पाण्यात अडकून पडलेल्या माणसांना वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जातायत. परंतु या पुराच्या पाण्यात मनुष्यच नव्हे, तर पशू-पक्षीही अडकून पडले आहेत. काही दिवसांपूर्वी एका हत्तीच्या पिलाला एका जवानानं वाचवल्याचा फोटोही व्हायरल झाला होता. या फोटोमध्ये त्या जवानानं हत्तीच्या पिलाला पुराच्या पाण्यातून वाचवण्यासाठी खांद्यावर घेतलं होतं आणि त्याचा जीव वाचवला होता.
विशेष म्हणजे काही वृत्तपत्रांनीही या हत्तीचा फोटो छापला आहे. परंतु या फोटोचं सत्य काही तरी वेगळं आहे. खरंतर हा फोटो केरळचा नसून तामिळनाडूतला आहे. 2017मधल्या ऊटी हिल स्टेशनचा आहे. ऊटी हिल स्टेशनपासून 50 किलोमीटर दूरवर मेट्टुपालयम येथे हत्तीच्या पिल्लाची आईशी चुकामूक झाल्यामुळे ते दरीत पडलं. त्याच दरम्यान वनाधिकारी पलानीस्वामी सरथकुमार कामावर हजर झाले. तेव्हा त्यांना एकानं सांगितलं की, वानभद्र कालियाम्मन मंदिराजवळ एका हत्तिणीनं रस्त्यावर धुमाकूळ घातला आहे.
जेव्हा सरथकुमार यांनी हत्तिणीला फटाक्यांच्या आवाजानं पळवून लावलं, त्यावेळी त्यांना शंका आली की अजूनही इथे कुठला तरी हत्ती अडकलेला असेल. त्यामुळे त्यांनी पूर्ण परिसराची टेहळणी केली. त्यावेळी त्यांना हे हत्तीचं पिल्लू दरीत अडकलेल्या अवस्थेत पाहायला मिळालं. त्यानंतर त्या पिल्लाला दरीतून बाहेर काढून त्यांनी हत्तिणीच्या स्वाधीन केलं.