CoronaVirus News : तृणमूल काँग्रेसच्या आमदाराचे कोरोनामुळे निधन
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2020 03:51 IST2020-06-25T03:45:43+5:302020-06-25T03:51:08+5:30
त्यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे.

CoronaVirus News : तृणमूल काँग्रेसच्या आमदाराचे कोरोनामुळे निधन
कोलकाता : तृणमूल काँग्रेसचे आमदार तमोनाश घोष (६४ वर्षे) यांचे कोरोनाच्या संसर्गामुळे बुधवारी सकाळी निधन झाले. त्यांच्यावर गेल्या काही आठवड्यांपासून कोलकाता येथील रुग्णालयात उपचार सुरू होते. ते राज्य परिवहन महामंडळाच्या दक्षिण विभागाचे (एसबीएसटीसी) अध्यक्ष होते. त्याच कामासाठी तमोनाश घोष हे दुर्गापूर येथे गेले होते. तिथून परतल्यानंतर ते आजारी पडल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालयात तमोनाश घोष यांच्यावर बायपास शस्त्रक्रियाही झाली होती. त्यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे. कालीघाट येथून निवडून आलेले तमोनाश घोष हे ममता यांचे गेल्या ३५ वर्षांपासूनचे सहकारी होते. घोष यांची पत्नी व दोन मुलींनाही कोरोनाचा संसर्ग झाला होता. पण उपचारानंतर त्या तिघी पूर्णपणे बऱ्या झाल्या होत्या. राज्यपाल जगदीप धनकर यांनीही तृणमूल काँग्रेसचे आमदार तमोनाश घोष यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. (वृत्तसंस्था)