ईडीविरोधात तृणमूल संतप्त, खासदारांची दिल्लीत निदर्शने; ८ खासदार पोलिसांच्या घेतले ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2026 06:04 IST2026-01-10T06:03:24+5:302026-01-10T06:04:32+5:30
दिल्लीत कर्तव्य भवनात घुसण्याचा प्रयत्न, बंगालमध्ये ममता बॅनर्जी रस्त्यावर

ईडीविरोधात तृणमूल संतप्त, खासदारांची दिल्लीत निदर्शने; ८ खासदार पोलिसांच्या घेतले ताब्यात
लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली :तृणमूल काँग्रेसची प्रचारयंत्रणा सांभाळणाऱ्या ‘आयपॅक’ कंपनीवर गुरुवारी ईडीने टाकलेल्या छापेसत्रानंतर राजकारण तापले आहे. शुक्रवारी तृणमूलच्या खासदारांनी केंद्र सरकारकडून तपास यंत्रणांचा गैरवापर होत असल्याचा आरोप करीत गृह मंत्रालयाच्या (कर्तव्य भवन) बाहेर निदर्शने केली.
यावेळी ८ खासदारांनी ईडीचा गैरवापर होत असल्याचे आरोप करणारे फलक हातात घेऊन ‘कर्तव्य भवन’मध्ये शिरण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी या सर्व खासदारांना गेटवरच रोखले. त्यानंतर खासदारांनी तेथेच धरणे आंदोलन सुरू केले. नंतर या खासदारांना दिल्ली पोलिसांनी बळजबरीने ताब्यात घेतले. दिल्लीत हा गोंधळ सुरू असताना पश्चिम बंगालमध्ये कोलकात्यात मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले.
सुरक्षेच्या कारणास्तव आंदोलनाला परवानगी नाही
पोलिसांनी यावेळी तृणमूलचे खासदार डेरेक ओब्रायन, शताब्दी रॉय, महुआ मोईत्रा, बापी हलदार, साकेत गोखले, प्रतिमा मंडल, कीर्ती आझाद आणि शर्मिला सरकार आणि इतर पक्षनेत्यांना ताब्यात घेऊन पार्लमेंट स्ट्रीट पोलिस ठाण्यामध्ये नेले. प्रतिबंधात्मक आदेश आणि सुरक्षेच्या कारणास्तव गृह मंत्रालयाबाहेर आंदोलनाला परवानगी नसल्याचे पोलिसांनी सांगितले.