वडिलांना वाचवण्यासाठी लेकीने बिबट्याशी दोन हात केले, उसाच्या तुकड्याने फोडून पळवून लावले
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2026 13:36 IST2026-01-08T13:24:42+5:302026-01-08T13:36:35+5:30
Uttar Pradesh News: बाप-लेकीचं नातं हे खास असंच असतं. एकमेकांवर असलेलं प्रेम, माया यामुळे ते एकमेकांसाठी काहीही करू शकतात. याचाच प्रत्यय देणारी घटना समोर आली आहे. यात एका मुलीने प्रसंगावधान राखत दाखवलेल्या धैर्यामुळे वडिलांचे प्राण वाचले.

वडिलांना वाचवण्यासाठी लेकीने बिबट्याशी दोन हात केले, उसाच्या तुकड्याने फोडून पळवून लावले
बाप-लेकीचं नातं हे खास असंच असतं. एकमेकांवर असलेलं प्रेम, माया यामुळे ते एकमेकांसाठी काहीही करू शकतात. याचाच प्रत्यय देणारी घटना उत्तर प्रदेशमधील बिजनौर येथून समोर आली आहे. येथे एका मुलीने प्रसंगावधान राखत दाखवलेल्या धैर्यामुळे वडिलांचे प्राण वाचले. उसाच्या फडात लपलेल्या बिबट्याने या मुलीच्या वडिलांवर हल्ला केला आणि त्यांना ओढत घेऊन जाऊ लागला. हे दृश्य पाहताच या मुलीने प्रसंगावधान राखत बिबट्याचा पाठलाग केला आणि हातात सापडलेल्या उसाच्या कांडक्याने त्याच्या तोंडावर फटके देण्यास सुरुवात केली. त्यामुळे घाबरलेल्या बिबट्याने तिथून पळ काढला. मुलीने दाखवलेल्या धैर्यामुळे तिच्या वडिलांचे प्राण वाचले. मात्र या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार बिजनौर जिल्ह्यातील शिवाला कलां पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नाजरपूर मंडडयो गावात बुधवारी संध्याकाळी रफिक अहमद हे त्यांच्या उसाच्या शेतामध्ये गुरांसाठी चारा आणण्यासाठी गेले होते. तेव्हा बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला. यावेळी त्यांच्यासोबत त्यांची मुलगी कैसर जहाँ ही देखील होती. त्याचवेळी बिबट्याने रफिक यांच्यावर हल्ला केला. त्यांना जबड्यात पकडून बिबट्या ओढत नेऊ लागला.
त्यावेळी तिथे असलेल्या केसर हिने न धाबरता धीर एकवटून जवळ पडलेला उसाचा तुकडा घेतला आणि बिबट्याच्या तोंडावर मारण्यास सुरुवात केली. तेवढ्यात आरडाओरड करत ग्रामस्थांनीही तिथे धाव घेतली. त्यामुळे गडबडलेल्या बिबट्याने रफिक यांना सोडून पळ काढला.