भोपाळमध्ये काळाचा घाला! मकर संक्रांतीच्यानिमित्ताने स्नानासाठी निघालेल्या ५ भाविकांचा भीषण अपघातात मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2026 12:07 IST2026-01-15T12:06:31+5:302026-01-15T12:07:21+5:30
मकर संक्रांतीच्या पवित्र दिवशी नर्मदा स्नानासाठी निघालेल्या भाविकांच्या आनंदावर काळाने विरजण घातले आहे.

भोपाळमध्ये काळाचा घाला! मकर संक्रांतीच्यानिमित्ताने स्नानासाठी निघालेल्या ५ भाविकांचा भीषण अपघातात मृत्यू
मकर संक्रांतीच्या पवित्र दिवशी नर्मदा स्नानासाठी निघालेल्या भाविकांच्या आनंदावर काळाने विरजण घातले आहे. मध्यप्रदेशातील भोपाळ जिल्ह्यातील बैरसिया येथे बुधवारी रात्री उशिरा एक हृदयद्रावक रस्ते अपघात झाला. भरधाव पिकअप आणि ट्रॅक्टर-ट्रॉली यांच्यात झालेल्या समोरासमोर धडकेत ५ भाविकांचा जागीच मृत्यू झाला, तर ९ जण गंभीर जखमी झाले आहेत. या भीषण अपघातामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून हळहळ व्यक्त केली जात आहे.
आनंदाचे रूपांतर शोकात
अपघातातील सर्व मृत आणि जखमी हे विदिशा जिल्ह्यातील सिरोंज येथील रहिवासी होते. मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर नर्मदा नदीत स्नान करण्यासाठी हे सर्वजण एका पिकअप वाहनाने होशंगाबादकडे जात होते. बुधवारी रात्री उशिरा त्यांचे वाहन बैरसिया येथील भोपाळ रोडवर पोहोचले असता, समोरून येणाऱ्या एका ट्रॅक्टर-ट्रॉलीने त्यांच्या वाहनाला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की पिकअप वाहन रस्त्यावर उलटले.
घटनास्थळी रक्ताचा सडा आणि आक्रोश
अपघात होताच परिसरात एकच चीख-पुकार सुरू झाली. रस्त्यावर सर्वत्र मृतदेहांचा खच पडला होता आणि जखमी नागरिक मदतीसाठी आक्रोश करत होते. स्थानिक नागरिकांनी तातडीने धाव घेत पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच पोलीस आणि प्रशासकीय पथक घटनास्थळी दाखल झाले. जखमींना तातडीने रुग्णवाहिकेने जवळच्या जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले असून, काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.
पोलीस काय म्हणतात?
बैरसियाचे ठाणे प्रभारी वीरेंद्र सिंह सेन यांनी दिलेल्या माहितीनुसार, "हा अपघात अत्यंत भीषण होता. पिकअप आणि ट्रॅक्टरच्या धडकेत ५ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. प्राथमिक तपासानुसार, दोन्ही वाहनांचा वेग प्रचंड होता आणि चालकाचा ताबा सुटल्याने ही दुर्घटना घडल्याचे समजते." पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
परिवारावर कोसळला दु:खाचा डोंगर
मकर संक्रांतीचा सण साजरा करण्यासाठी आणि पुण्य पदरी पाडण्यासाठी निघालेल्या या कुटुंबांच्या आयुष्यात काही क्षणांत अंधार पसरला. मृतांच्या नातेवाईकांचा आक्रोश पाहून उपस्थितांच्याही डोळ्यांत पाणी आले. या अपघातामुळे भोपाळ रोडवरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती, जी पोलिसांनी क्रेनच्या सहाय्याने वाहने हटवून पूर्ववत केली.