तीन वकील अन् 'ती' एकच मागणी! सोनमविरोधात राजा रघुवंशीचं कुटुंब केस लढणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2025 15:51 IST2025-07-07T15:49:58+5:302025-07-07T15:51:44+5:30
सोनमनेच राजाचा जीव घेतला असला, तरी यामागे काहीतरी वेगळं कारस्थान होतं, असा दाट संशय राजाच्या कुटुंबाने व्यक्त केला.

तीन वकील अन् 'ती' एकच मागणी! सोनमविरोधात राजा रघुवंशीचं कुटुंब केस लढणार
राजा रघुवंशी याची मेघालयमध्ये हत्या का करण्यात आली, या प्रश्नाचं उत्तर त्यांचं कुटुंब आजही शोधत आहे. सोनमनेच राजाचा जीव घेतला असला, तरी यामागे काहीतरी वेगळं कारस्थान होतं, असा दाट संशय राजाच्या कुटुंबाने व्यक्त केला. यासाठी त्यांनी सोनमची नार्को टेस्ट करण्याची मागणी केली. शिलाँग पोलिसांनी नार्को टेस्टची मागणी योग्य नसल्याचं म्हटलं असलं तरी, कुटुंबीय या मागणीवर ठाम आहेत. राजाच्या हत्येमागे मोठं रहस्य असू शकतं, जे नार्को टेस्टने समोर येऊ शकतं, असं त्यांना वाटत आहे. आता राजाच्या कुटुंबीयांनी यासाठी न्यायालयाचा दरवाजा ठोठावण्याचा निर्णय घेतला आहे.
नार्को टेस्टसाठी वकिलांची नियुक्ती
सूत्रांनुसार, राजाच्या कुटुंबीयांनी शिलाँग ते दिल्लीपर्यंत खटला लढण्यासाठी तीन वकिलांची नियुक्ती केली आहे. लवकरच शिलाँग उच्च न्यायालयात अर्ज दाखल करून सोनम रघुवंशी आणि तिचा कथित प्रियकर राज यांची नार्को टेस्ट करण्याची मागणी केली जाईल. याव्यतिरिक्त, दिल्लीतील सर्वोच्च न्यायालयाच्या एका वकिलाशीही संपर्क साधण्यात आला आहे. जर उच्च न्यायालयाने याचिका फेटाळली, तर देशाच्या सर्वोच्च न्यायालयात ही मागणी केली जाऊ शकते.
राजा रघुवंशीचा भाऊ वारंवार नार्को टेस्टची मागणी करत आहे. मात्र, शिलाँग पोलिसांचे म्हणणे आहे की, आरोपींनी आपला गुन्हा कबूल केला आहे आणि हत्येशी संबंधित सर्व महत्त्वाचे पुरावे सापडले आहेत, त्यामुळे नार्को टेस्टची आवश्यकता नाही.
लग्नाच्या अवघ्या १० दिवसांनंतर घडला प्रकार
सोनम रघुवंशी आणि राज यांच्यासह सर्व आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. इंदूरच्या सोनम आणि राजाचं लग्न ११ मे रोजी झालं होतं. अवघ्या १० दिवसांनंतर ते दोघे हनिमूनसाठी मेघालयला गेले होते. इथे २३ मे रोजी ते दोघे अचानक बेपत्ता झाले. त्यानंतर २ जून रोजी राजाचा मृतदेह एका खड्ड्यात सापडला. अनेक दिवसांपासून बेपत्ता असलेल्या सोनमने अचानक उत्तर प्रदेशातील गाझीपूर येथे आत्मसमर्पण केले.
आतापर्यंतच्या तपासानुसार, शिलाँग पोलिसांचे म्हणणे आहे की, राज आणि सोनमने राजाच्या हत्येचा कट रचला होता. सोनम राजच्या प्रेमात होती आणि कुटुंबाने तिचं लग्न राजाशी लावून दिलं होतं. राजच्या तीन मित्रांच्या मदतीने सोनमने हनिमूनदरम्यान राजाची हत्या करवून घेतली. परंतु ,राजाच्या कुटुंबाचं म्हणणं आहे की, यामागचं कारण एवढंच नसावं. जर सोनमला राजशी लग्न करायचं नव्हतं, तर तिने नकार का दिला नाही? ती राजाला सोडून पळून जाऊ शकली असती? पण तिने हत्या करण्याचा निर्णय का घेतला? हे प्रश्न आजही राजाच्या कुटुंबीयांना सतावत आहेत.