'पक्षाची कामे करायची नसतील तर निवृत्ती घ्या', खरगेंनी जाहीर सभेत काँग्रेस नेत्यांना खडसावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2025 15:59 IST2025-04-09T15:58:57+5:302025-04-09T15:59:25+5:30

गुजरातच्या अहमदाबाद येथे साबरमती नदीच्या काठावर काँग्रेसचे राष्ट्रीय अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे.

'Those who cannot do party work should retire', Mallikarjun Kharge issues ultimatum to Congress leaders at public meeting | 'पक्षाची कामे करायची नसतील तर निवृत्ती घ्या', खरगेंनी जाहीर सभेत काँग्रेस नेत्यांना खडसावले

'पक्षाची कामे करायची नसतील तर निवृत्ती घ्या', खरगेंनी जाहीर सभेत काँग्रेस नेत्यांना खडसावले

AICC Meeting : गुजरातमध्येकाँग्रेसचे राष्ट्रीय अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे. य कार्यक्रमात पक्षाच्या प्रमुखांसह सर्व ज्येष्ट नेते सहभागी झाले आहेत. यावेळी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पक्षाच्या सर्व नेत्यांना कडक संदेश दिला आहे. पक्षाची कामे न करणारे अथवा दिलेली जबाबदारी योग्यरित्या न पार पाडणाऱ्यांनी निवृत्ती घ्यावी, असे खरगेंनी स्पष्टपणे सांगितले. 

जिल्हाध्यक्षांबद्दल खरगे काय म्हणाले?
अहमदाबाद येथे साबरमती नदीच्या काठावर काँग्रेस अधिवेशनाला संबोधित करताना खरगे म्हणाले, संघटनेच्या जडणघडणीत जिल्हाध्यक्षांची भूमिका महत्त्वाची असणार आहे. म्हणूनच त्यांची नियुक्ती एआयसीसीच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार काटेकोरपणे आणि निष्पक्षपणे केली पाहिजे. जिल्हाध्यक्षांनी नियुक्ती झाल्यापासून एका वर्षाच्या आत सर्वोत्तम लोकांचा समावेश करुन बूथ कमिटी, मंडल कमिटी, ब्लॉक कमिटी आणि जिल्हा कमिटी तयार करावी. यामध्ये कोणताही पक्षपात नसावा, असे त्यांनी सांगितले.

...तर निवृत्ती घ्या

खरगे पुढे म्हणतात, आम्ही देशभरातील जिल्हाध्यक्षांच्या तीन बैठकाही बोलावल्या. मी आणि राहुल गांधी यांनी त्यांच्याशी बोललो आणि त्यांचे मत जाणून घेतले. भविष्यात आम्ही निवडणुकीसाठी उमेदवार निवड प्रक्रियेत जिल्हाध्यक्षांना सहभागी करून घेणार आहोत. मला सर्वांना असेही सांगायचे आहे की, जे पक्षाच्या कामात मदत करत नाहीत, दिलेल्या जबाबदाऱ्या पार पाडत नाहीत, त्यांनी निवृत्त व्हावे.

भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढा...

आपण पुन्हा एकदा भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढत आहोत. स्वातंत्र्याच्या या दुसऱ्या लढाईत पुन्हा शत्रू अन्याय, असमानता, भेदभाव, गरिबी आणि सांप्रदायिकता आहेत. फरक एवढाच आहे की पूर्वी परदेशी लोक अन्याय, गरिबी आणि असमानतेला प्रोत्साहन देत होते, आता आपले स्वतःचे सरकार ते करत आहे. पूर्वी परदेशी लोक जातीयवादाचा फायदा घेत असत, आज आपलेच सरकार त्याचा फायदा घेत आहे. पण आपण ही लढाई देखील जिंकू, असा दावाही त्यांनी यावेळी केला.


 

Web Title: 'Those who cannot do party work should retire', Mallikarjun Kharge issues ultimatum to Congress leaders at public meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.