"फटाके फोडणारे देशद्रोही आहेत, भारतात फटाक्यांवर बंदी घाला"; भाजपा नेत्या मनेका गांधी भडकल्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2026 16:51 IST2026-01-05T16:50:01+5:302026-01-05T16:51:04+5:30
माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपा नेत्या मनेका गांधी यांनी देशभरात फटाक्यांवर बंदी घालण्याची मागणी केली आहे.

"फटाके फोडणारे देशद्रोही आहेत, भारतात फटाक्यांवर बंदी घाला"; भाजपा नेत्या मनेका गांधी भडकल्या
दिल्ली आणि आजूबाजूच्या भागात वाढत्या प्रदूषणाने चिंता वाढवली आहे. यावरून विरोधक सरकारवर टीका करत आहे. तातडीने उपाययोजना करण्याची मागणीही होत आहे. याच मुद्द्यावरून भाजपाच्या नेत्या आणि माजी केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांनी फटाक्यांवर देशात बंदी घालण्याची मागणी केली आहे. प्रदूषण निर्माण होण्यात फटाक्यांचा वाटा मोठा असल्याचा दावा करत फटाके फोडणारे देशद्रोही आहेत, असेही त्या म्हणाल्या.
मनेका गांधी यांनी प्रदूषणाच्या मुद्द्यावर बोलताना दिल्ली आणि संपूर्ण भारतामध्ये फटाक्यांवर बंदी घालण्याची मागणी केली. दिल्लीतील प्रदूषणाचे मुख्य कारण फटाके असल्याचे त्या म्हणाल्या.
मनेका गांधी म्हणाल्या, फटाके फोडणारे देशद्रोही
भाजपा नेत्या मनेका गांधी म्हणाल्या, "जर तुम्ही दोन रात्रींमध्ये ८०० कोटींचे फटाके फोडणार असाल, तर हवेचं काय होणार? फटाक्यांवर संपूर्ण देशात बंदी घातली पाहिजे. जे लोक फटाके फोडतात, त्यांना देशद्रोही म्हटले पाहिजे. कारण त्यांच्या कृत्यामुळे सर्वांना त्रास होत आहे."
मनेका गांधींनी सरकारवरही अप्रत्यक्षपणे निशाणा साधला. "आता सरकारकडून अपेक्षा ठेवण्यापेक्षा लोकांनीच प्रदूषण थांबवण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. लोकांनी प्रदूषण रोखण्यासाठी चळवळ सुरू केली पाहिजे", असे त्या म्हणाल्या.
गौ तस्करी थांबवायला हवी
गौ तस्करीच्या मुद्द्यावर बोलताना मनेका गांधी म्हणाल्या, "ओडिशा आणि बिहारमधून लाखो गायी तस्करीसाठी आंध्र प्रदेश आणि पश्चिम बंगालमध्ये नेल्या जात आहेत. हे थांबवणे आपली जबाबदारी आहे. एकही गाय कत्तलखान्यात जायला नको."
मोदी सरकारवरच मनेका गांधींनी टीका केली. "जेव्हा भाजपा सत्तेत आली, तेव्हा मला आशा होती की, बीफ निर्यात बंद होईल. कारण घोषणापत्रातच हे होतं. परंतू दुर्दैवाने आतापर्यंत ती बंद झालेली नाही. फक्त रोजगारासाठी आपण गौ वंश हत्या सुरू ठेवू शकत नाही", असे त्या म्हणाल्या.