"ज्यांनी नेहमीच आंबेडकरांचा अपमान केला, ते गैरसमज पसरवतायत, मी स्वप्नातही..."; अमित शाहंचा काँग्रेसवर पलटवार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2024 19:28 IST2024-12-18T19:26:58+5:302024-12-18T19:28:10+5:30
शाह म्हणाले, "असे यामुळे झाले, कारण भाजपच्या वक्त्यांनी, काँग्रेस आंबेडकर विरोधी पक्ष आहे, संविधान विरोधी आहे, असे सांगितले. काँग्रेसने सावरकरजींचा अपमान केला. काँग्रेसने आणीबाणी लादून राज्यघटना पायदळी तुडवली. काँग्रेसने भारतीय सैन्याचा अपमान केला. काँग्रेसने भारताची भूमी देऊन टाकली, या गोष्टी संसदेत सिद्ध झाल्यानंतर, काँग्रेसने खोटे पसरवण्यास सुरुवात केली."

"ज्यांनी नेहमीच आंबेडकरांचा अपमान केला, ते गैरसमज पसरवतायत, मी स्वप्नातही..."; अमित शाहंचा काँग्रेसवर पलटवार
केंद्रीय गृहमंत्री तथा भाजप नेते अमित शहा यांनी बुधवारी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला. आपण स्वप्नातही आंबेडकरांचा अपमान करू शकत नाही. काँग्रेस पक्ष आंबेडकर विरोधी आहे. काँग्रेस पक्ष संविधान विरोधी आहे. बाबासाहेबांच्या पश्चातही काँग्रेसने कधी बाबासाहेबांना आदर दिला नाही, असे अमित शाह यांनी म्हटले आहे. ते जेपी नड्डा आणि अश्विनी वैष्णव यांच्यासोबत संयुक्त पत्रकार परिषदेत बोलत होते.
अमित शाह म्हणाले, "संविधानाला 75 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल लोकसभा आणि राज्यसभेत चर्चा आयोजित करण्यात आली होती. यात देशाची 75 वर्षांची गोरवशाली यात्रा, विकास यात्रा आणि उपलब्धी आदींवर चर्चा करण्यात आली. संसदेत पक्ष आणि विरोधक आहेत. लोकांचे स्वतःचे मत असणे स्वाभाविक आहे. पण संसदेत जेव्हा चर्चा होते तेव्हा ती वस्तुस्थिती आणि सत्याला धरून असावी. मात्र, कालपासून काँग्रेसने ज्या पद्धतीने वस्तुस्थिती विपर्यास करून मांडली याचा मी तीव्र शब्दात निषेध करतो.
शाह पुढे म्हणाले, "असे यामुळे झाले, कारण भाजपच्या वक्त्यांनी, काँग्रेस आंबेडकर विरोधी पक्ष आहे, संविधान विरोधी आहे, असे सांगितले. काँग्रेसने सावरकरजींचा अपमान केला. काँग्रेसने आणीबाणी लादून राज्यघटना पायदळी तुडवली. काँग्रेसने भारतीय सैन्याचा अपमान केला. काँग्रेसने भारताची भूमी देऊन टाकली, या गोष्टी संसदेत सिद्ध झाल्यानंतर, काँग्रेसने खोटे पसरवण्यास सुरुवात केली. काँग्रेस पक्ष आंबेडकरविरोधी आहे. काँग्रेस पक्ष संविधानविरोधी आहे. काँग्रेसने लष्करातील शहीद जवानांचा अपमान केला. काँग्रेस सावरकर विरोधी आहे. बाबासाहेबांच्या पश्चातही काँग्रेसने बाबासाहेबांना कधीही आदर दिला नाही. पंडितजींच्या (नेहरू) अनेक पुस्तकांत लिहिलेले आहे की, त्यांनी बाबासाहेबांना कधीही योग्य स्थान दिले नाही."
"काँग्रेसने बाबासाहेबांना भारतरत्न दिले नाही, पंडित नेहरूंनी स्वतःला भारतरत्न देऊन घेतले. काँग्रेसने आपल्या नेत्यांना भारतरत्न दिले. 1990 पर्यंत त्यांनी आंबेडकरांना भारतरत्न मिळणार नाही याची व्यवस्था केली. माझी विधाने चुकीच्या पद्धतीने विपर्यास करून मांडण्यात आली. काँग्रेस खोट्या बातम्या पसरवते. मी आंबेडकरांच्या विरोधात कधीही बोलू शकत नाही. काँग्रेसने माझी राज्यसभेतील विधाने चुकीच्या पद्धतीने मांडली," असेही शाह म्हणाले.
भारतरत्न देण्यासंदर्भात बोलायचे तर, "काँग्रेस नेत्यांनी अनेक वेळा स्वतःच स्वतःला बारतरत्न दिले आहेत. 1955 मध्ये नेहरूजींनी स्वतःला भारतरत्न दिले, 1971 मध्ये इंदिराजींनी स्वतःला भारतरत्न दिला. मात्र, 1990 मध्ये काँग्रेस सत्तेत नसताना आणि भाजपच्या पाठिंब्याचे सरकार असताना बाबासाहेबांना भारतरत्न मिळाले. 1990 पर्यंत काँग्रेसने बाबासाहेबांना भारतरत्न मिळू नये यासाठी प्रयत्न केले. एवढेच नाही, तर बाबासाहेबांची 100वी जयंती साजरी करण्याचीही मनाई केली गेली," असेही शाह यावेळी म्हणाले.