यंदाचा मान्सून ठरला 'घातक'; अतिवृष्टी, पूरामुळे देशात १,५२८ जणांचा गेला बळी!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2025 06:02 IST2025-10-01T06:02:06+5:302025-10-01T06:02:33+5:30
यंदाच्या मान्सून हंगामात म्हणजेच जून ते सप्टेंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टी, पूर, भूस्खलन, वीज कोसळणे आणि उष्णतेच्या लाटेमुळे देशभरात किमान १,५२८ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती भारतीय हवामान विभागाने दिली आहे.

यंदाचा मान्सून ठरला 'घातक'; अतिवृष्टी, पूरामुळे देशात १,५२८ जणांचा गेला बळी!
नवी दिल्ली : यंदाच्या मान्सून हंगामात म्हणजेच जून ते सप्टेंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टी, पूर, भूस्खलन, वीज कोसळणे आणि उष्णतेच्या लाटेमुळे देशभरात किमान १,५२८ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती भारतीय हवामान विभागाने दिली आहे. या कालावधीत मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश आणि महाराष्ट्र ही राज्ये सर्वाधिक प्रभावित ठरली.
आकडेवारीनुसार, अतिवृष्टीमुळे ९३५ जणांचे प्राण गेले, तर ५७० जणांचा मृत्यू वीज कोसळणे व मेघगर्जनेसारख्या घटनांमुळे झाला.
कुठे, किती पाऊस झाला?
१. देशभरात यंदा ९३७.२ मिमी पाऊस झाला, जो सरासरीपेक्षा ८ टक्के जास्त आहे. पूर्व व ईशान्य भारतात मात्र २० टक्के कमी पाऊस झाला. येथे केवळ १,०८९.९ मिमी पाऊस पडला, जो १९०१ नंतर दुसऱ्या क्रमांकाचा सर्वांत कमी पाऊस आहे.
२. उत्तर-पश्चिम भारतात ७४७.९ मिमी पाऊस झाला, जो सरासरीपेक्षा २७.३ टक्के जास्त आहे. पंजाबमध्ये दशकांतील सर्वांत मोठा पूर आला.
राज्यनिहाय परिस्थिती
> मध्य प्रदेशात २९० मृत्यू नोंदले गेले, त्यापैकी १५३ जण अतिवृष्टी व पुरामुळे, तर १३५ जण वीज कोसळून मृत्युमुखी पडले.
> हिमाचल प्रदेशात १४१ जणांचा बळी गेला. जोरदार पावसामुळे झालेल्या भूस्खलन व अचानक आलेल्या पुराचा हा मुख्य परिणाम होता.
> जम्मू-काश्मीरमध्ये १३९ मृत्यू, तर महाराष्ट्रात १३५ मृत्यू, प्रामुख्याने पुरामुळे झाले.
> उत्तर प्रदेशात २०१ मृत्यू, त्यापैकी ११२ वीज कोसळल्यामुळे व ६९ अतिवृष्टीमुळे झाले.
> झारखंडमध्ये १२९ मृत्यू, त्यापैकी ९५ वीज कोसळून झाले.
> बिहारमध्ये ६२ जणांचा मृत्यू, सर्व वीज कोसळण्यामुळे झाला.