Diwali Rain Alert: यंदाच्या दिवाळीत गुलाबी थंडी नाही तर पाऊस बरसणार, मुंबईसह महाराष्ट्रात हवामान असं असणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2025 16:25 IST2025-10-16T16:24:55+5:302025-10-16T16:25:25+5:30
Weather Update: काही दिवसांपूर्वी मान्सूननं माघार घेतली असली तरी पावसाचं सावट अद्याप कायम आहे. त्यामुळे यावर्षीच्या दिवाळीत गुलाबी थंडीऐवजी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यताच अधिक आहे, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

Diwali Rain Alert: यंदाच्या दिवाळीत गुलाबी थंडी नाही तर पाऊस बरसणार, मुंबईसह महाराष्ट्रात हवामान असं असणार
यंदाच्या पावसाळ्यात मान्सूनचा वेगळाच पॅटर्न दिसून आला होता. त्यात मुसळधार पाऊस, पूर आणि भूस्खलनामुळे देशातील विविध भागात मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं होतं. मराठवाड्यातही पूरस्थितीमुळे प्रचंड वित्तहानी झाली. काही दिवसांपूर्वी मान्सूननं माघार घेतली असली तरी पावसाचं सावट अद्याप कायम आहे. त्यामुळे यावर्षीच्या दिवाळीत गुलाबी थंडीऐवजी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यताच अधिक आहे, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. भारतीय हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार येणाऱ्या ६ ते ७ दिवसांमध्ये महाराष्ट्र, केरळ, तामिळनाडू येथे मुसळधार पाऊस पडू शकतो. देशातील बहुतांश भागात २० ऑक्टोबर रोजी दिवाळी साजरी होणार असल्याने यावर्षी पावसात भिजून दिवाळी साजरी करावी करावी लागू शकते.
भारतीय हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार १९ ते २१ ऑक्टोबरदरम्यान, मुंबईतील अनेक भागात ढगाळ वातावरण राहू शकतं. तसेच अधूनमधून सौम्य पर्जन्यवृष्टी होण्याची शक्यता आहे. या दरम्यान, मुंबईतील बहुतांश भागात तापमान २३ डिग्री सेल्सियस ते ३६ डिग्री सेल्सियस या दरम्यान, राहण्याची शक्यता आहे. याबरोबरच केरळ, तामिळनाडू आणि पुदुच्चेरीच्या काही भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडू शकतो, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
तर स्कायमेटने वर्तवलेल्या अंदाजानुसार कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने येणाऱ्या दिवसांत दक्षिण तामिळनाडू आणि केरळच्यया काही भागात मध्यम ते मुसळधार पाऊस पडू शकतो. मात्र या पावसामुळे पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाही. मात्र समुद्रात अधिक उंचीच्या लाटा उसळण्याची आणि हवेचा वेग वाढण्याची शक्यता आहे.