‘ही मुलगी आमच्या मुलाची नाही’, सासू-सासरे सारखा घ्यायचे संशय, संतप्त सुनेने केलं भयंकर कृत्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2025 11:17 IST2025-11-19T11:17:24+5:302025-11-19T11:17:42+5:30
Rajasthan Crime News: झालेली मुलगी आपल्या मुलाची नाहीच, असा आरोप करत सासू-सासरे सातत्याने चारित्र्यावर संशय घेत असल्याने संतापलेल्या महिलेने तिच्याच ९ महिन्यांच्या मुलीची गळा आवळून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

‘ही मुलगी आमच्या मुलाची नाही’, सासू-सासरे सारखा घ्यायचे संशय, संतप्त सुनेने केलं भयंकर कृत्य
झालेली मुलगी आपल्या मुलाची नाहीच, असा आरोप करत सासू-सासरे सातत्याने चारित्र्यावर संशय घेत असल्याने संतापलेल्या महिलेने तिच्याच ९ महिन्यांच्या मुलीची गळा आवळून हत्या केल्याची धक्कादायक घटना राजस्थानमधील खैरथल-तिजारा जिल्ह्यातील किशनगडबास येथे घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी आईला अटक केली आहे. तिने पोलिसांनी केलेल्या चौकशीदरम्यान धक्कादायक माहिती दिली आहे. माझे सासू सासरे सातत्याने माझ्या चारित्र्यावर संशय घ्यायचे. त्यामुळे वैतागून मी माझ्या ९ महिन्यांच्या मुलीची गळा आवळून हत्या केली, असे या महिलेने सांगितले. या प्रकरणी आता पोलीस आणखी तपास करत आहेत.
राजस्थानमधील खैरथल तिजारा जिल्ह्यातील किशनगड बास येथे १६ नोव्हेंबर रोजी एका ९ महिन्यांच्या मुलीची हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली होती. या प्रकरणी जफरुद्दीन नावाच्या व्यक्तीने किशनगड बास पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. रुजीना नावाच्या महिलेने तिच्या ९ महिन्यांच्या मुलीची गळा आवळून हत्या केल्याचे या तक्रारीत म्हटले होते. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेत तपास सुरू केला होता.
अक्स नावाच्या या मुलीचा मृतदेह खोलीतील खाटीवर पडलेल्या अवस्थेत सापडला होता. त्यानंतर या मृतदेहाचं पोलिसांनी शवविच्छेदन करून घेतलं. तसेच सापडलेल्या पुराव्यांच्या आधारे मृत अक्स हिची आई रुजीना हिला अटक केली. त्यानंतर पोलिसांनी केलेल्या चौकशीमध्ये रुजीना हिने धक्कादायक माहिती दिली. ‘सासू-सासरे आणि सासरची इतर मंडळी मला टोमणे मारायचे, माझ्यावर संशय घ्यायचे. मला मुलगा व्हावा अशी त्यांची अपेक्षा होती. मात्र मुलगी झाल्याने ते नाराज झाले होते. तसेच ही मुलगी त्यांच्या मुलग्यापासून झालेली नाही, असा आरोप ते करायचे’, असेही तिने सांगितले.