"मोदी आणि अमित शाह यांना तर हरवू शकत नाहीत, म्हणून..."; खर्गेंच्या संघावरील बंदीच्या मागणीवर बाबा रामदेव यांची तिखट प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2025 14:33 IST2025-11-02T14:32:26+5:302025-11-02T14:33:09+5:30
"देशविरोधी आणि सनातनविरोधी शक्ती जेव्हा संघ अथवा हिंदूत्ववादी शक्तींना विरोध करतात, तेव्हा त्याच्या मागे काही तरी स्वार्थ असतो, छुपा अजेंडा असतो."

"मोदी आणि अमित शाह यांना तर हरवू शकत नाहीत, म्हणून..."; खर्गेंच्या संघावरील बंदीच्या मागणीवर बाबा रामदेव यांची तिखट प्रतिक्रिया
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर (आरएसएस) बंदी घालण्याच्या मागणीवर, योगगुरू बाबा रामदेव यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. “ज्यांचे विचार भारत आणि भारतीयतेशी मेळ खात नाहीत, तेच अशा पद्धतीचा अजेंडा चालवतात. त्यांना लढायचेच असल्यास तर त्यांनी नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्याशी लढावे, पण त्यांना तर हरवू शकत नाहीत, म्हणून आरएसएसवर अभद्र टिप्पणी करतात,” असे बाबा रामदेव यांनी म्हटले आहे.
दिल्ली येथे एएनआयशी बोलताना रामदेव म्हणाले, “आरएसएस राजकीय पक्ष नाही. राजकीय विंग भाजप आहे. मी गेल्या दोन-तीन दशकांपासून आरएसएसला जवळून पाहिले आहे. संघात अत्यंत तपस्वी आणि देशभक्त लोक कार्यरत आहेत. डॉ. हेडगेवार आणि सदाशिवराव गोलवलकर यांसारख्या महान व्यक्तींनी त्यात आयुष्य झोकून दिले. आजही लाखो संघ कार्यकर्ते देशसेवेसाठी कार्यरत आहेत. देशविरोधी आणि सनातनविरोधी शक्ती जेव्हा संघ अथवा हिंदूत्ववादी शक्तींना विरोध करतात, तेव्हा त्याच्या मागे काही तरी स्वार्थ असतो, छुपा अजेंडा असतो.
काय म्हणाले होते खर्गे? -
दरम्यान, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करताना, “जर मोदी खरंच भारताचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या विचारांचा सन्मान करत असतील, तर त्यांनी आरएसएसवर बंदी घालावी,” असे म्हटले होते. एढेच नाही तर, “देशातील सर्व चुकांची आणि कायदा-सुव्यवस्थेच्या सर्व समस्यांसाठी भाजप आणि आरएसएस जबाबदार आहे,” असा आरोपही खर्गे यांनी केला होता.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमधील केवडिया येथे राष्ट्रीय एकता दिनाच्या कार्यक्रमावेली काँग्रेसवर केलेल्या आरोपानंतर खर्गे यांनी हे विधान केले होते. काँग्रेसने सरदार वल्लभभाई पटेल यांचा वारसा योग्यरित्या पुढे न नेल्याचा आरोप पंतप्रधान मोदींनी केला होता.