गेल्या काही दिवसांपासून भारत आणि पाकिस्तानच्या सीमेवर असलेल्या तणावामुळे अनेक गावांमध्ये सुरक्षेच्या दृष्टीने खबरदारीचे अनेक उपाय केले जात आहेत. त्यामुळे ग्रामस्थांच्या दिनक्रमामध्येही बदल झाला आहे. या तणावाचा परिणाम पशुपक्ष्यांवरही होत आहे. दरम्यान, जैसलमेरमध्ये लुप्तप्राय होण्याच्या मार्गावर असलेल्या माळढोकाच्या पिल्लांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. जैसलमेरमधील सम येथे ड्रोन दिसल्याचे वृत्त आल्यानंतर जैसलमेरमधील माळढोक ब्रिडिंग सेंटरमधून नऊ पिल्लांना दुसरीकडे हलवण्यात आलं आहे.
केंद्र आणि राज्य सरकारच्या निर्देशांनुसार लष्कर आणि प्रशासनाच्या सहकार्याने वनविभागाने तज्ज्ञांच्या उपस्थितीत जैसलमेरपासून सुमारे ७०० किमी दूर अंतरावर असलेल्या अजमेर सेंटर येथे या पिल्लांना हलवले आहे. कोट्यवधी रुपये खर्चून सुरू करण्यात आलेल्या माळढोक प्रकल्पांतर्गत शास्त्रज्ञ नैसर्गिक आणि कृत्रिमपणे जन्मलेल्या पिल्लांना सरकारने प्रजनन केंद्रामधून सुरक्षित ठिकाणी नेण्याचे आदेश दिले आहेत.
प्रधान मुख्य वन संरक्षक राजस्थान (पीसीसीएफ) अरिजित बॅनर्जी यांच्या आदेशानुसार पहिल्या टप्प्यामध्ये ९ पिल्लांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. त्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील संघर्ष थांबल्याने दुसऱ्या टप्प्यातील शिफ्टिंग प्रक्रियेबाबत मुख्य वनसंरक्षक (सीसीएफ) आर. के. जैन यांनी पत्र लिहून मार्गदर्शनाची मागणी केली आहे.