महाकुंभ मेळ्यासंदर्भातील खर्गेंच्या विधानावरून सभागृहात एकच गदारोळ; धनखड म्हणाले, शब्द माघारी घ्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2025 17:50 IST2025-02-03T17:49:43+5:302025-02-03T17:50:18+5:30
खर्गे म्हणाले, आपम कुणालाही दोषी ठरवण्यासाठी हा आकडा बोललेलो नाही...

महाकुंभ मेळ्यासंदर्भातील खर्गेंच्या विधानावरून सभागृहात एकच गदारोळ; धनखड म्हणाले, शब्द माघारी घ्या
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी सोमवारी राज्यसभेत, महाकुंभ मेळ्यात नुकत्याच झालेल्या चेंगराचेंगरीत "हजारो" लोकांचा मृत्यू झाला, असे विधान केले. त्यांच्या या विधानानंतर, सभागृहात एक गदारोळ झाला. यानंतर सभापती जगदीप धनखड यांनी त्यांना त्यांचे विधान मागे घेण्यास सांगितले.
पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, "खर्गे राष्ट्रपतींच्या अभिभाषणानंतर, वरिष्ठ सभागृहात झालेल्या चर्चेत सहभागी झाले होते. यावेळी ते म्हणाले, महाकुंभ मेळ्यात नुकत्याच झालेल्या चेंगराचेंगरीत 'हजारो' लोकांचा मृत्यू झाला. त्यांच्या या वक्तव्यामुळे सत्ताधारी पक्षाचे सदस्य आक्रमक झाले आणि सभागडहात गदारोळाचे वातावरण निर्माण झाले.
यानंतर खर्गे लगेचच म्हणाले की, "हा माझा अनुमान आहे. जर हे खरे नसेल, तर आपण (सरकारने) खरा आकजा सांगाला हवा. मी कुणालाही दोष देण्यासाठी 'हजारो' शब्द वापरला नाही. पण किमान किती लोकांचा मृत्यू झाला? याची माहिती तरी द्या. जर मी चुकलो असेल तर माफीही मागेन. त्यांनी किती लोक मारले गेले, किती बेपत्ता आहेत याची माहिती दियायला हवी."
काय म्हणाले होते खर्गे? -
गेल्या 29 जानेवारीला मौनी अमावस्येच्या मुहुर्तावर स्नानावेळी चेंगराचेंगरी झाली होती. यात सरकारी आकडेवारीनुसार, ३० जणांचा मृत्यू झाला होता. खर्गे म्हणाले, "मी महाकुंभ मेळ्यात मृत्यू झालेल्या लोकांना श्रद्धांजली अर्पण करतो. कुंभ मेळ्यात मृत्यू पावलेल्या हजारो लोकांना...," यानंतर सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी विरोध केला.
धनखड म्हणाले, विधान मागे घ्या -
यासंदर्भात सभापती धनखड यांनी खर्गे यांना त्यांचे विधान मागे घेण्याचे आवाहन केले. धनखड म्हणाले, "विरोधी पक्षनेत्यांनी हजारोंच्या संख्येने आकडे दिले आहेत... मी त्यांना आवाहन करतो की या सभागृहात जे काही बोलले जाते ते अत्यंत महत्त्वाचे आहे.' आपण असे काही बोलला आहात की, ज्यामुळे सर्वांना धक्का बसला आहे. येथून जाणारा संदेश, मग त्याचे भलेही खंडन झालेले असो, तो संपूर्ण जगात जातो.’’
यावर खर्गे म्हणाले, आपम कुणालाही दोषी ठरवण्यासाठी हा आकडा बोललेलो नाही. यावेळी त्यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनाही श्रद्धांजली अर्पण केली.