रील्स बनवण्याचा नाद, घरमालकाच्या मुलाशी जवळीक, पतीची हत्या करून फरार झालेल्या पत्नीला बॉयफ्रेंडसह अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2025 09:29 IST2025-08-19T09:27:06+5:302025-08-19T09:29:09+5:30
Rajasthan Crime News: पतीची हत्या केल्यानंतर त्याचा मृतदेह निळ्या ड्रममध्ये लपवून मुलांना घेऊन बॉयफ्रेंडसोबत फरार झालेल्या महिलेला पोलिसांनी तिच्या बॉयफ्रेंडसह अटक केली आहे.

रील्स बनवण्याचा नाद, घरमालकाच्या मुलाशी जवळीक, पतीची हत्या करून फरार झालेल्या पत्नीला बॉयफ्रेंडसह अटक
पतीची हत्या केल्यानंतर मुलांना घेऊन बॉयफ्रेंडसोबत फरार झालेल्या महिलेला पोलिसांनी तिच्या बॉयफ्रेंडसह अटक केली आहे. राजस्थानमधील खैरथल जिल्ह्यातील किसनगडबास येथे ही धक्कादायक घटना घडली होती. मुळचा उत्तर प्रदेशमधील असलेल्या हंसराम नावाच्या व्यक्तीची हत्या करून त्याचा मृतदेह एका निळ्या ड्रममध्ये लपवण्यात आला होता. तसेच मृतदेहाचं लवकरात लवकर विघटन व्हावं यासाठी त्यावर मीठ टाकण्यात आलं होतं.
हंसराम याची हत्या झाली तेव्हा त्याची पत्नी आणि तीन मुले बेपत्ता असल्याचेही उघडकीस आले होते. एवढंच नाही तर तो ज्या घरात भाडेकरू म्हणून राहायचा त्या घरमालकाचा मुलगाही ही घटना घडल्यापासून बेपत्ता होता. मात्र पोलिसांनी तपासाची सूत्रे वेगाने हलवत आरोपी पत्नी आणि तिचा बॉयफ्रेंड असलेला घरमालकाचा मुलगा जितेंद्र यांना खैरथल-तिजारा येथून अटक केली आहे.
याबाबत अधिक माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, हंसराम याचा मृतदेह रविवारी एका घराच्या छतावर ड्रममध्ये सापडला होता. या प्रकरणी त्याची पत्नी सुनीता आणि जितेंद्र यांना ताब्यात घेण्यात आलं आहे. आता सुनीता आणि जितेंद्र यांची चौकशी केली जात आहे. पोलिसांनी पुढे सांगितले की, हंसराम याच्या मृतदेहावर धारदार हत्याराने वार करण्यात आले होते. तसेच शेजाऱ्यांना दुर्गंध आल्यानंतर घराच्या छतावरून मृतदेह जप्त करण्यात आला होता.
विट भट्टीवर काम करणारा हंसराम हा गेल्या दोन महिन्यांपासून घराच्या छतावर भाडेकरू म्हणून राहत होता. त्याला दारू पिण्याचं व्यसन लागलेलं होतं. तसेच तो जितेंद्र याच्यासोबत मद्यपान करत असे. हंसरामा याच्या पत्नीला सोशल मीडियावर रील बनवण्याचा शौक होता. ती नेहमी पतीसोबत रील तयार करून सोशल मीडियावर टाकत असे. पतीच्या हत्येनंतर ही महिला तीन मुलांसोबत बेपत्ता झाली होती. तर घरमालकाचा मुलगा हा सुद्धा गायब होता. अखेरीस पोलिसांनी या दोघांनाही पकडण्यात यश मिळवले आहे.