सत्ताधारी, निवडणूक आयोगाने देशाला फसवले; संपूर्ण निवडणूक प्रणालीची झाली चोरी; राहुल गांधी यांचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2025 08:13 IST2025-08-08T08:12:00+5:302025-08-08T08:13:54+5:30
निवडणूक अधिकाऱ्यांनी राहुल गांधी यांच्याकडे शपथपत्र मागितले आहे. त्याबाबत ते म्हणाले की, मी एक राजकारणी आहे. मी जे जनतेला सांगतो तेच माझे वचन असते. मी निवडणूक गैरप्रकारांबद्दल जाहीर वक्तव्ये केली आहेत. तेच माझे शपथपत्र आहे असे समजा. मी दिलेल्या माहितीचा आयोगाने इन्कार केलेला नाही, याकडेही राहुल यांनी लक्ष वेधले.

सत्ताधारी, निवडणूक आयोगाने देशाला फसवले; संपूर्ण निवडणूक प्रणालीची झाली चोरी; राहुल गांधी यांचा आरोप
नवी दिल्ली : देशाच्या कर्नाटक राज्यातील एकाच विधानसभा मतदारसंघामध्ये एक लाख खोटे मतदार आहेत हे आम्ही आता जनतेसमोर सबळ पुराव्यानिशी मांडले आहे. तरीही निवडणूक आयोग म्हणतो की स्वच्छ व पारदर्शक पद्धतीने निवडणुका घेतल्या जात आहेत. या देशात संपूर्ण निवडणूक प्रणालीची चोरी करण्यात येत आहे असा गंभीर आरोप लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी गुरुवारी केला.
दिल्ली येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ढीगभर पुरावे स्क्रीनवर दाखविले. मतांची चोरी करण्याचे प्रकार काही राज्यांतच नव्हे तर संपूर्ण देशभरात होत आहेत. निवडणूक प्रणालीशी संबंधित सीसीटीव्ही फुटेज व मतदार याद्या या सदर गैरप्रकारांचा सबळ पुरावा असून तो नष्ट करण्याचा निवडणूक आयोग प्रयत्न करत आहे. सत्ताधारी भाजप व निवडणूक आयोग दोघे मिळून ही फसवणूक करत आहेत. याप्रकरणात न्याययंत्रणेचा हस्तक्षेप आवश्यक आहे.
‘निवडणूक आयोगाला भीती’
बोगस प्रकार उघडकीस येतील याच भीतीने निवडणूक आयोग आम्हाला निवडणुकांशी संबंधित डेटा देत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अत्यल्प बहुमताच्या बळावर केंद्रात सरकार स्थापन केले आहे. भाजपने सत्ता टिकवण्यासाठी फक्त अधिकच्या २५ जागांची चोरी केली. भाजपने लोकसभा निवडणुकीत ३३,००० पेक्षा कमी मतांनी २५ जागा जिंकल्या. खोट्या मतदारांची नावे मतदारयाद्यांत समाविष्ट करण्याचे प्रकार सुरू आहेत. त्यामुळे निवडणूक आयोगाने जारी केलेल्या मतदारयादीवर किती विश्वास ठेवावा असा प्रश्न निर्माण झाला आहे असेही राहुल गांधी म्हणाले.
राहुल गांधी यांनी दिली काही उदाहरणे
बंगळुरू सेंट्रल लोकसभा मतदारसंघात काही मतदारांच्या पत्त्यावर "शून्य" लिहिलेले आहे, काहींच्या घराचा पत्ता नाही, काही जणांच्या पत्त्याची पडताळणी करता येत नाही, तर काहींच्या पत्त्यात घरक्रमांक, रस्ता क्रमांक सुद्धा "०" असा असल्याची माहिती राहुल यांनी दिली.
३८ वर्षांच्या सरिता देवी यांच्या पित्याचे नाव ITSDLHUG असे नोंदले गेले असून त्यांचाही पत्ता “0” आहे. ४६ वेगवेगळ्या कुटुंबांतील मतदार एका छोट्या घरात राहत असल्याचे दाखविण्यात आले आहे. त्या घराला भेट दिली तेव्हा तिथे कोणीच राहत नसल्याचे निदर्शनास आले.
छोट्याशा घरात ६८ लोक, प्रत्यक्षात...
राहुल गांधी यांनी सांगितले की, एके ठिकाणी ‘१५३ BIERE LAB’ या नावाने नोंदविलेल्या पत्त्यावर ६८ लोक राहतात, असे मतदार यादीत दाखवले गेले आहे. त्यांनी तिथे प्रत्यक्ष जाऊन चौकशी केली, तेव्हा तिथे या लोकांपैकी कोणीही आढळून आले नाही. शकुंतला नावाच्या ७० वर्षीय महिलेचे नाव दोन वेळा मतदार यादीत आहे. त्यांच्या नावाने फॉर्म-६चा चुकीचा वापर केला. या नावावर कोणी तरी दोन वेळा मतदान केले असावे, असा संशय राहुल गांधी यांनी व्यक्त केला.
‘माझी वक्तव्ये हेच शपथपत्र’
निवडणूक अधिकाऱ्यांनी राहुल गांधी यांच्याकडे शपथपत्र मागितले आहे. त्याबाबत ते म्हणाले की, मी एक राजकारणी आहे. मी जे जनतेला सांगतो तेच माझे वचन असते. मी निवडणूक गैरप्रकारांबद्दल जाहीर वक्तव्ये केली आहेत. तेच माझे शपथपत्र आहे असे समजा. मी दिलेल्या माहितीचा आयोगाने इन्कार केलेला नाही, याकडेही राहुल यांनी लक्ष वेधले.
२०२४ची लोकसभा निवडणूक
अंतर्गत सर्वेक्षणात काँग्रेस आघाडीवर
काँग्रेसचे अंदाज विरुद्ध निकाल
मतदारसंघ अंदाज जिंकल्या गमावल्या
कर्नाटक (२०२४) १६ ९ ७
बंगळुरू सेंट्रल मतदारसंघ
भाजप ६,५८,९१५ मते
कॉँग्रेस ६,२६,२०८ मते
(३२,७०७ मतांच्या फरकाने भाजप विजयी)
महादेवपुरा विधानसभा मतदारसंघ
काँग्रेस १,१५,५८६ मते
भाजप २,२९,६३२ मते
(१,१४,०४६ मतांच्या फरकाने भाजप विजयी)
आयोग म्हणतो... त्या मतदारांची नावे, शपथपत्र द्या
बंगळुरू : कर्नाटकमधील मतदारयादीत चुकीने समाविष्ट करण्यात आलेल्या किंवा वगळण्यात आलेल्या मतदारांची नावे तसेच निवडणूक अधिकाऱ्यांना आवश्यक कारवाई करता यावी यासाठी शपथपत्र सादर करावे. तसेच जनतेची दिशाभूल करणे थांबवावे असे त्या राज्यातील मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी लोकसभेचे विरोधी पक्षनेेते राहुल गांधी यांना सांगितले आहे.
२०२४ च्या निवडणुकीत कर्नाटकातील महादेवपुरा विधानसभा मतदारसंघात १,००,२५० मतांची चोरी झाल्याचा गंभीर आरोप राहुल गांधी यांनी गुरुवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला होता. या आरोपांनंतर कर्नाटकच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी राहुल गांधी यांना लिहिलेल्या एका पत्रात म्हटले आहे की, अपात्र मतदारांच्या समावेशाबाबत आणि पात्र मतदारांना मतदार यादीतून वगळल्याबाबत आपण पत्रकार परिषदेत उल्लेख केला आहे.
अशा मतदारांची नावे निवडणूक आयोगाला सादर करा. मतदार यादी पारदर्शक पद्धतीने, लोकप्रतिनिधित्व अधिनियम १९५०, मतदार नोंदणी नियम १९६० आणि आयोगाच्या वेळोवेळी दिलेल्या सूचनांनुसार तयार करण्यात आली आहे. या याद्यांच्या प्रती काँग्रेस प्रतिनिधींनाही देण्यात आल्या आहेत, असेही कर्नाटकच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
संविधानाविरोधात काँग्रेसने मोठा कट आखला : भाजप
राहुल गांधी यांनी निवडणुकीत गैरप्रकार केल्याचा निवडणूक आयोगावर केलेला आरोप हीच पूर्वनियोजित फसवणूक आहे, अशी टीका भाजपने गुरुवारी केली आहे. भारताची लोकशाही व संविधानाविरोधात काँग्रेसने मोठा कट रचला असून, हा पक्ष घटनात्मक संस्थांवर पद्धतशीर हल्ले करत आहे, असाही आरोप भाजपने केला.
आयोगाची निर्लज्ज भूमिका ठेवते मतदारांना वंचित
पश्चिम बंगालमधील खऱ्या मतदारांना त्यांच्या अधिकारापासून दूर ठेवण्यासाठी निर्लज्ज भूमिका बजाविल्याचा आरोप करत तृणमूलचे लोकसभेतील नेते अभिषेक बॅनर्जी यांनी निवडणूक आयोगाला लक्ष्य केले.
संसदेत पुन्हा गदारोळ
बिहार मतदारयाद्यांच्या पुनरीक्षणाचा मुद्दा गुरुवारीही संसदेच्या दोन्ही सभागृहांत गाजला. विरोधी पक्ष यावर आक्रमक झाल्याने लोकसभेचे कामकाज प्रारंभी दोन वेळा व नंतर दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.