NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2025 15:00 IST2025-08-16T15:00:10+5:302025-08-16T15:00:40+5:30
Ncert India Partition: भारत पाकिस्तान फाळणीबद्दल एनसीआरटीने नवीन पाठ्यक्रम तयार केला असून, यात तीन व्यक्तींना फाळणीसाठी जबाबदार ठरवण्यात आले आहे.

NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
Ncert on India Pakistan Partition: 1947 मध्ये झालेल्या भारत-पाकिस्तानबद्दल एनसीआरटीने नवीन पाठ्यक्रम तयार केला असून, सहावी ते आठवी आणि नववी ते १२वी दोन मॉड्युल तयार केले गेले आहेत. यात भारत-पाकिस्तान फाळणी कशी झाली आणि कोणत्या नेत्यांनी स्वीकारली, याबद्दलचा उल्लेख करण्यात आला आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
एनसीआरटीच्या पुस्तकामध्ये म्हटले आहे की, भारताची फाळणी कोणत्याही एका व्यक्तीमुळे झालेली नाही, यासाठी तीन व्यक्ती, पक्ष जबाबदार होते. यात पहिले होते मोहम्मद अली जिन्ना ज्यांनी वेगळ्या पाकिस्तानची मागणी केली. दुसरी होती काँग्रेस अर्थात नेहरू ज्यांनी फाळणी स्वीकारली आणि लॉर्ड माऊंटबॅटन ज्यांनी फाळणी लागू केली.
एनसीआरटीच्या नव्या मॉड्युलमध्ये फाळणीबद्दल काय?
या पाठ्यक्रमामध्ये म्हटले आहे की, भारताची फाळणी चुकीच्या विचारांमुळे झाली. मुस्लीम लीगने १९४० मध्ये लाहौरमध्ये एक बैठक घेतली होती. तिथे जिन्नांनी म्हटले होते की, हिंदू आणि मुस्लीम वेगवेगळे धर्म आहेत. परंपरा वेगवेगळ्या आहेत. ब्रिटिशांची इच्छा होती की भारत स्वतंत्र व्हावा, पण फाळणी होऊ नये.
सरदार वल्लभभाई पटेलांची काय होती इच्छा?
"भारताला स्वातंत्र्य मिळण्याआधी फाळणीबद्दल वेगवेगळे मतप्रवाह होते. सरदार वल्लभभाई पटेल हे सुरुवातीला फाळणीच्या बाजूने नव्हते, पण नंतर त्यांनी ही गोष्ट अनिवार्य असलेल्या औषधाप्रमाणे स्वीकारली. १९४७ मध्ये मुंबईतील एका सभेत त्यांनी म्हटले होते की, 'देश युद्धभूमी बनला आहे. दोन्ही समुदाय आता शांततेत राहू शकणार नाही. गृहयुद्ध होण्यापेक्षा फाळणी केलेली बरी."
लॉर्ड माऊंटबॅटन फाळणीबद्दल काय म्हणालेले?
पुस्तकात म्हटले आहे की, भारताचे अखेरचे व्हाईसरॉय माऊंटबॅटन यांनी म्हटले होते की, 'मी भारताची फाळणी केलेली नाही. याला भारतीय नेत्यांनीच मंजुरी दिली. मी फक्त ती शांतता पूर्ण मार्गाने लागू करण्याचे काम केले. घाई करण्याची चूक माझी होती, पण त्यानंतर झालेल्या हिंसाचाराची जबाबदारी भारतीयांची होती.'
महात्मा गांधींनी फाळणीला विरोध केला, पण परिस्थिती अशी झाली की नेहरू आणि पटेलांनी गृहयुद्ध भडकण्याच्या भीतीने फाळणी स्वीकारली. महात्मा गांधींनी विरोधी भूमिका सोडली आणि १४ जून १९४७ रोजी काँग्रेस कार्य समितीच्या बैठकीमध्ये इतर नेत्यांनाही भारताच्या फाळणीसाठी तयार करण्यात आले.
काँग्रेसची अभ्यासक्रमावर टीका
काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते पवन खेरा यांनी एनसीआरटीच्या अभ्यासक्रमावर टीका केली आहे. एनसीआरटीच्या मॉड्युलमध्ये पूर्ण सत्य सांगितले गेलेले नाहीये. यात फक्त काँग्रेस आणि जिन्नांना फाळणीसाठी जबाबदार ठरवले गेले आहे, हे अर्धसत्य आहे, असे ते म्हणाले.