क्रूरतेचा कळस! सैनिकाचे पोट फाडून त्यात ठेवला बॉम्ब; नक्षलवादी योगेंद्र कसा पकडला गेला?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2025 09:23 IST2025-07-15T09:20:56+5:302025-07-15T09:23:22+5:30

Naxalite Yogendra : अटक झालेला नक्षलवादी योगेंद्र गंझू उर्फ पवन हा झारखंडमधील अनेक जिल्ह्यांमध्ये डझनभर गंभीर गुन्ह्यांमध्ये सामील होता.

The height of cruelty! A soldier's stomach was ripped open and a bomb was placed inside; How was Naxalite Yogendra caught? | क्रूरतेचा कळस! सैनिकाचे पोट फाडून त्यात ठेवला बॉम्ब; नक्षलवादी योगेंद्र कसा पकडला गेला?

क्रूरतेचा कळस! सैनिकाचे पोट फाडून त्यात ठेवला बॉम्ब; नक्षलवादी योगेंद्र कसा पकडला गेला?

झारखंडमध्ये सेंट्रल कोलफील्ड्स लिमिटेडच्या (CCL) एका कर्मचाऱ्याकडून एक कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आली होती. या धमकीमागे भाकपाच्या (माओवादी) कोयल-शंख झोन कमिटीचं नाव समोर आलं होतं. आता पोलिसांनी या प्रकरणात चार कुख्यात नक्षलवाद्यांना अटक केली आहे. या नक्षलवाद्यांमध्ये योगेंद्र गंझू उर्फ पवन गंझू या अत्यंत क्रूर नक्षलवाद्याचाही समावेश आहे. याने एका जवानाच्या हौतात्म्यानंतर त्याचं पोट फाडून बॉम्ब पेरण्याचं क्रूर कृत्य केलं होतं. 

नक्षलवाद्यांच्या मुसक्या आवळल्या

या नक्षलवाद्यांना अटक करण्यासाठी रांचीचे एसएसपी चंदन कुमार सिन्हा यांनी एक विशेष पथक तयार केलं होतं. गुप्त माहितीच्या आधारे, खलारी पोलीस स्टेशन हद्दीतील बक्सी बंगला चट्टी नदी परिसरात सापळा रचून चार कुख्यात नक्षलवाद्यांना अटक करण्यात आली. यात योगेंद्र गंझू उर्फ पवन गंझू, मुकेश गंझू, राजकुमार नाहक आणि मनु गंझू यांचा समावेश आहे. त्यांच्याकडून एक भरलेलं देशी पिस्तूल, तीन जिवंत काडतुसं आणि इतर आक्षेपार्ह साहित्य जप्त करण्यात आलं आहे.

२५ जून रोजी मागितली होती १ कोटीची खंडणी

२५ जून २०२५ रोजी सीसीएलच्या महाव्यवस्थापक कार्यालयात कार्यरत असलेल्या एका कर्मचाऱ्याला भाकपा माओवादी संघटनेच्या नावाने एक कोटी रुपयांची खंडणीची धमकी देण्यात आली होती. या प्रकरणी पीडित व्यक्तीने खलारी पोलीस ठाण्यात एफआयआर नोंदवला होता. या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन, रांची ग्रामीण एसपी यांच्या निर्देशानुसार खलारी डीएसपी यांच्या नेतृत्वाखाली एक छापेमारी पथक तयार करण्यात आलं. या पथकाने बक्सी बंगला चट्टी नदीजवळून चार नक्षलवाद्यांना अटक केली.

कोण आहे योगेंद्र गंझू उर्फ पवन गंझू?

अटक झालेला नक्षलवादी योगेंद्र गंझू उर्फ पवन हा झारखंडमधील अनेक जिल्ह्यांमध्ये डझनभर गंभीर गुन्ह्यांमध्ये सामील होता. २०१३ मध्ये लातेहारच्या गारू पोलीस स्टेशन हद्दीतील कटिया जंगलात माओवादी आणि सुरक्षा दलांमध्ये झालेल्या चकमकीत एका पोलीस जवानाला वीरमरण आलं होतं. त्यावेळी या जवानाच्या मृतदेहात बॉम्ब पेरल्याचा आरोप योगेंद्रवर आहे. योगेंद्रने जवानाचं पोट फाडून बॉम्ब पेरला होता.

पवन गंझू २००६ मध्ये संघटनेत सामील झाला आणि गारू-सरयू क्षेत्राचा एरिया कमांडर बनला. २००९ मध्ये तो सब-झोनल कमांडर झाला. २०१२ मध्ये त्याला अटक झाली, पण नंतर त्याने संघटनेपासून काही काळ दूर राहिला. आर्थिक अडचणींमुळे तो पुन्हा संघटनेत सामील झाला आणि व्यावसायिक, कंत्राटदार, कोळसा व्यापारी यांच्याकडून खंडणी गोळा करू लागला. याच क्रमात पवन आणि त्याच्या साथीदारांनी सीसीएलच्या कर्मचाऱ्याकडून एक कोटी रुपयांची खंडणी मागितली होती.

Web Title: The height of cruelty! A soldier's stomach was ripped open and a bomb was placed inside; How was Naxalite Yogendra caught?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.