Parliament Session:संसदेच्या पावसाळी अधिवेशन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये सातत्याने गदारोळ पाहायला मिळत आहे. या गोंधळामुळे एक दिवसही कामकाज व्यवस्थित होऊ शकले नाही. विरोधक सातत्याने मतदार यादीतील घोटाळा आणि विशेष सखोल पुनर्निरक्षण (SIR) या मुद्द्यावर चर्चा करण्याची मागणी करत आहेत. मात्र, सरकारने स्पष्टपणे सांगितले की, संसदेचा बराच वेळ वाया गेला आहे. त्यामुळे आता दोन्ही सभागृहात फक्त विधेयके मंजूर होतील.
केंद्रीय संसदीय कार्य मंत्री किरेन रिजिजू म्हणाले, काँग्रेस आणि विरोधी पक्षांनी पावसाळी अधिवेशनात बराच वेळ वाया घालवला आहे. आता आम्हाला अधिक वेळ वाया घालवू द्यायचा नाही. आता आम्ही लोकसभा आणि राज्यसभेतून महत्त्वाची विधेयके मंजूर करून घेऊ. आजही विरोधकांनी निवडणूक आयोगाकडे वेळ मागितला, आयोगाने ३० सदस्यांना चर्रेसाठी बोलावले, पण ते गेलेच नाहीत.
एका व्यक्तीच्या मूर्खपणामुळे देशाचे नुकसानएक व्यक्ती आणि एक कुटुंबाच्या मूर्खपणामुळे देश इतका मोठा तोटा सहन करू शकत नाही. अनेक विरोधी खासदारही म्हणाले की, ते असहाय्य आहेत. त्यांचे नेते त्यांना गोंधळ घालण्यास भाग पाडतात. आम्ही देशाचा आणि संसदेचा वेळ एकाच मुद्द्यावर वाया जाऊ देणार नाही. म्हणूनच, आम्ही आता महत्त्वाची विधेयके मंजूर करुन घेऊ. राष्ट्रीय क्रीडा प्रशासन विधेयक, २०२५ आणि राष्ट्रीय डोपिंग विरोधी सुधारणा विधेयक, २०२५ पुढील विचार आणि मंजूरीसाठी लोकसभेत ठेवण्यात आले, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.
कोणाच्या इशाऱ्यावर विरोधक प्रतिमा मलिन करत आहेत?रिजिजू पुढे म्हणाले, हे लोक संसदेवर किंवा निवडणूक आयोगावर विश्वास ठेवत नाहीत. कोणाच्या इशाऱ्यावर हे लोक प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करत आहेत. आम्ही विरोधी पक्षांना चर्चेत सहभागी होण्याची शेवटची विनंती करत आहोत. महत्त्वाच्या विधेयकांवर चर्चा करा आणि जर काही सुधारणा असतील तर द्या, परंतु चर्चेत सहभागी व्हा. विरोधी पक्षाने त्यांची जबाबदारी समजून घ्यावी. मी इतका बेजबाबदार विरोधी पक्ष कधीच पाहिला नाही, अशी टीका रिजिजूंनी यावेळी केली.