'मंत्री शाहमुळे देश लज्जित', सुप्रीम काेर्टाचा दणका; मगरीच्या अश्रूंशी तुलना करीत नाकारली माफी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2025 13:44 IST2025-05-20T13:43:47+5:302025-05-20T13:44:31+5:30
शाह यांच्याविरोधात चौकशीसाठी तीन सदस्यीय विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्याचे व या पथकात राज्याबाहेरील अधिकारी नेमण्याचे आदेश न्यायालयाने मध्य प्रदेशच्या पोलिस महासंचालकांना सोमवारी दिले.

'मंत्री शाहमुळे देश लज्जित', सुप्रीम काेर्टाचा दणका; मगरीच्या अश्रूंशी तुलना करीत नाकारली माफी
नवी दिल्ली : कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल मध्य प्रदेशचे मंत्री विजय शाह यांनी केलेल्या असभ्य वक्तव्याने संपूर्ण देश लज्जित झाला, अशा कडक शब्दांत त्यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले. ‘माफी मागताना शाह यांनी ढाळलेले अश्रू हे नक्राश्रू होते’, असा शेरा मारत त्यांची माफीही न्यायालयाने फेटाळून लावली. तसेच, शाह यांच्याविरोधात चौकशीसाठी तीन सदस्यीय विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्याचे व या पथकात राज्याबाहेरील अधिकारी नेमण्याचे आदेश न्यायालयाने मध्य प्रदेशच्यापोलिस महासंचालकांना सोमवारी दिले.
न्या. सूर्य कांत आणि न्या. एन. कोटिश्वर सिंग यांच्या खंडपीठाने मंत्री शाह यांना सवाल केला की, कुरेशी यांच्याबद्दल तुम्ही केलेल्या वक्तव्याचे व त्यानंतर मागितलेल्या माफीचे व्हिडीओ आम्ही पाहिले. त्यात तुमच्या डोळ्यांत अश्रूही दिसले. ते अश्रू खरे होते की तो कायदेशीर कारवाईपासून वाचण्यासाठी केलेला प्रयत्न होता? कर्नल सोफिया यांच्याबद्दल बोलताना तुम्ही अत्यंत अश्लील भाषा वापरण्याच्या विचारात होतात. पण त्यावेळी तुम्ही थोडा शहाणपणा दाखवला किंवा तुम्हाला शब्द सापडले नसावेत. असभ्य वक्तव्य करताना तुम्हाला लाज वाटली पाहिजे. आपल्या देशाला लष्कराचा विलक्षण अभिमान आहे आणि त्यातल्या एका महिला अधिकाऱ्याबद्दल तुम्ही असे वक्तव्य करता? असा कठोर शब्दांत न्या. सूर्य कांत यांनी शाह यांना खडसावले.
अटकेपासून तात्पुरता दिलासा -
न्यायालयाने शाह यांना तत्काळ अटकेपासून तात्पुरता दिलासा दिला आहे. न्यायालयाने म्हटले की, याचिकाकर्त्याने तपासात पूर्ण सहकार्य करावे, ही महत्त्वाची अट आहे. त्याच्या अधीन राहून सध्या त्यांच्या अटकेला स्थगिती दिली.
कर्नल सोफियांबद्दल केलेल्या वक्तव्याची थेट माफी हवी हाेती मंत्री शाह यांना खंडपीठाने म्हटले की, तुम्ही चूक मान्य करून थेट माफी मागायला हवी होती. मात्र जर मी वादग्रस्त विधाने केली असतील तर त्याबद्दल माफी मागतो, अशी भूमिका तुम्ही घेतली. ही माफी मागायची पद्धत नाही. तुम्ही जे असभ्य वक्तव्य केले त्यामुळे संपूर्ण देश लज्जित झाला. लोकप्रतिनिधी, मंत्री म्हणून प्रत्येक शब्द जबाबदारीने वापरायला हवा होता.
शाह यांच्यावतीने वकील मणिंदर सिंग यांनी सांगितले की, माझ्या अशिलाने माफी मागितली आहे. यावर न्या. सूर्य कांत यांनी विचारले की, विजय शाह यांनी कोणत्या पद्धतीने माफी मागितली आहे हे आम्ही पाहिले. त्यांच्या भाषेत व वागणुकीत पश्चात्ताप दिसत नाही. ‘माफी’ या शब्दाला एक अर्थ असतो. काहीवेळा लोक संकटातून वाचण्यासाठी माफी मागतात. आम्हाला तुमची माफी नको आहे. ज्या व्यक्तीने असभ्य वक्तव्य केले आहे, त्याचे परिणाम त्याला भोगावे लागतील.
एसआयटी चौकशीचे आदेश
विजय शाह यांच्या चौकशीसाठी पोलिस महानिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली आणि एका महिला अधिकाऱ्याचा समावेश असलेले तीन सदस्यीय एसआयटी पथक उद्या, मंगळवारी सकाळी १० वाजेपर्यंत स्थापन करण्याचे आदेश न्यायालयाने दिले.
पथकात कोणीही आयपीएस अधिकारी मध्य प्रदेशचा नसावा. ते मध्य प्रदेश केडरचे असू शकतात, परंतु ते राज्यातील मूळ रहिवासी नसावेत. एसआयटीने तपासाचा पहिला प्रगती अहवाल २८ मे रोजी न्यायालयात सादर करावा, असे न्यायालयाने म्हटले.