विवाहाचे सर्व विधी सुरू असताना, एक अनपेक्षित क्षण सगळ्या समारंभावर पाणी फिरवणारा ठरला. उत्तर प्रदेशातील महाराजपूर परिसरात एका वधूने 'वराचे हात थरथरत आहेत' हे लक्षात येताच लग्न करण्यास ठाम नकार दिला. यामुळे समारंभात एकच खळबळ उडाली असून, हा प्रकार सध्या स्थानीय पातळीवर चर्चेचा विषय ठरला आहे.
वधूचा थेट नकार; "मी हे लग्न करणार नाही"मिळालेल्या माहितीनुसार, महाराजपूरमधील एका गावातील मुलीचे लग्न शिवली परिसरातील तरुणासोबत ठरले होते. शुक्रवारी संध्याकाळी वराची मिरवणूक वधूच्या घरी आली. द्वारचाराचे विधी सुरळीत पार पडले. स्टेजवर हार घालण्याचा कार्यक्रम सुरू असताना, वधूच्या लक्षात आलं की वराचे हात सतत थरथरत आहेत.
वधूने लगेच प्रश्न विचारला की, “तुमचे हात का थरथरत आहेत?” यावर वराने मौन साधले. पण, त्याच्या कुटुंबीयांनी सांगितले की तो घाबरलेला आहे, पण वधूने ही कारणे स्पष्टपणे फेटाळून लावली. तिने म्हटले, "तो आजारी असावा किंवा त्याने दारू घेतली आहे. मी अशा व्यक्तीशी लग्न करू शकत नाही."
पंचायत झाली पण निर्णय बदलला नाही!या नकारामुळे लग्नस्थळी गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. दोन्ही कुटुंबांमध्ये वाद सुरू झाले. यानंतर पंचायत बोलावण्यात आली, पण वधू आपल्या निर्णयावर ठाम राहिली. शनिवारी सकाळपर्यंत संवाद सुरू होता. काही स्थानिक प्रतिष्ठित लोकांनी मध्यस्थी केली, पण त्याचा काही उपयोग झाला नाही.
नशेत होता वर?वधूच्या नातेवाईकांनी आरोप केला की, वर दारूच्या नशेत होता. वरातीच्या वेळीदेखील त्याचे हात थरथरत असल्याचे काही पाहुण्यांनी देखील सांगितले. नववधूने स्वाभिमानाने निर्णय घेत, लग्न मोडण्याचा निर्णय घेतला. अखेर वराला वधूशिवाय वरात परत न्यायची वेळ आली. लग्न मोडल्यानंतर दोन्ही बाजूंमध्ये पंचायतीच्या माध्यमातून खर्चाची देवाणघेवाण करण्यात आली.