ज्या मुलाचे १८ वर्षांपूर्वी अंत्यसंस्कार केले, तोच घरी परतला! नियतीचा खेळ पाहून तुम्हीही व्हाल थक्क
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2026 14:07 IST2026-01-04T14:05:59+5:302026-01-04T14:07:33+5:30
१८ वर्षे ५ महिन्यांपूर्वी बेपत्ता झालेला रौशन कुमार नावाचा युवक अखेर आपल्या घरी सुखरूप परतला आहे.

ज्या मुलाचे १८ वर्षांपूर्वी अंत्यसंस्कार केले, तोच घरी परतला! नियतीचा खेळ पाहून तुम्हीही व्हाल थक्क
'देव तारी त्याला कोण मारी' या म्हणीचा प्रत्यय बिहारमधील मुजफ्फरपूर जिल्ह्यात आला आहे. १८ वर्षे ५ महिन्यांपूर्वी बेपत्ता झालेला रौशन कुमार नावाचा युवक अखेर आपल्या घरी सुखरूप परतला आहे. ज्या मुलाचा शोध घेऊन दमलेल्या आई-वडिलांनी २००७ मध्ये त्याला मृत मानले होते आणि समाजाच्या सांगण्यावरून त्याचे प्रतीकात्मक अंत्यसंस्कारही केले होते, तोच मुलगा अचानक समोर आल्याने संपूर्ण परिसरात सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.
परीक्षेला गेला अन् गायब झाला!
ही हृदयस्पर्शी कहाणी लक्ष्मण नगर गावातील विश्वनाथ शाह आणि रामपरी देवी यांचा धाकटा मुलगा रोशनची आहे. २००७मध्ये रोशन मॅट्रिकची परीक्षा दिल्यानंतर अचानक बेपत्ता झाला होता. काही मित्रांच्या नादी लागून तो दिल्लीला जाण्यासाठी निघाला, पण वाटेत रेल्वेमध्ये तो आपल्या सोबत्यांपासून ताटातूट झाली. मानसिक स्थिती बेताची असल्याने त्याला घराचा पत्ता सांगता आला नाही आणि तो अनोळखी शहरात भरकटला.
हार मानली आणि अंत्यसंस्कार उरकले
मुलगा बेपत्ता झाल्यापासून त्याचे वडील विश्वनाथ शाह यांनी शोधण्यात कोणतीही कसर सोडली नाही. दिल्लीपासून अनेक शहरांचे उंबरठे झिजवले, पण काहीच सुगावा लागला नाही. अखेर अनेक महिने वाट पाहून आणि सामाजिक दबावामुळे हताश झालेल्या कुटुंबाने जड अंतःकरणाने रौशनला मृत मानले आणि त्याचे अंतिम संस्कारही उरकले.
असा मिळाला पुन्हा जन्म...
दुसरीकडे, रोशन हा छपरा परिसरात भटकत असताना 'सेवा कुटीर' नावाच्या संस्थेच्या संपर्कात आला. तिथे त्याला संरक्षण मिळाले आणि भोजपूर जिल्ह्यातील मानसिक रुग्णालयात त्याच्यावर उपचार झाले. उपचारादरम्यान रौशनने आपल्या वडिलांचे नाव आणि गाव आठवून सांगितले. त्यानंतर जिल्हा प्रशासन आणि सामाजिक संस्थांच्या मदतीने त्याच्या कुटुंबाचा शोध घेण्यात आला.
आईच्या डोळ्यांनी ओळखला काळजाचा तुकडा!
२८ डिसेंबर रोजी माहिती मिळताच रोशनचे आई-वडील छपरा येथे पोहोचले. तब्बल १८ वर्षांनंतर आपल्या लेकाला समोर पाहताच आई रामपरी देवी यांनी त्याला घट्ट मिठी मारली. आईने काळजाच्या तुकड्याला ओळखण्यात एक क्षणही लावला नाही. १ जानेवारी रोजी रौशनला त्याच्या गावी आणले गेले. तीन भाऊ आणि दोन बहिणींमध्ये सर्वात लहान असलेल्या रोशनला पुन्हा जिवंत पाहून संपूर्ण गाव आनंदले.
"आमची अनेक वर्षांची आस आज पूर्ण झाली. आमचा मुलगा परत येईल अशी आशा सोडली होती, पण देवाने चमत्कार केला," असे म्हणताना आई-वडिलांच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहत होते. सध्या रौशनची मानसिक स्थिती पूर्णपणे ठीक नसली तरी, कुटुंब आता त्याच्या उपचारासाठी आणि सुखासाठी एकत्र आले आहे.