“पाकिस्तानला कमी लेखता कामा नये, २४ तासांत कारवाई करायला हवी होती”: संजय राऊत
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2025 11:19 IST2025-05-08T11:18:15+5:302025-05-08T11:19:51+5:30
Thackeray Group MP Sanjay Raut News: पहलगाम हल्ल्यानंतर बोलावण्यात आलेल्या सर्वपक्षीय बैठकीला ठाकरे गटाचे नेते गैरहजर राहिले. ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरही सर्वपक्षीय बैठक होत असून, त्याला ठाकरे गटाचे नेते जाणार आहेत.

“पाकिस्तानला कमी लेखता कामा नये, २४ तासांत कारवाई करायला हवी होती”: संजय राऊत
Thackeray Group MP Sanjay Raut News: पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झाल्यानंतर घाईघाईत सर्वपक्षीय बैठक घेण्यात आली. आम्ही त्या सर्वपक्षीय बैठकीला गेलो नाही. परंतु, आमचे म्हणणे होते की, पहिली कारवाई करा. २४ तासांत कारवाई करायला हवी होती आणि त्यानंतर सर्वपक्षीय बैठक बोलवायला हवी होती. त्या सर्वपक्षीय बैठकीत ते काय सांगणार होते की, लोक कसे मारले गेले, दहशतवादी कुठून आले, नेमके काय झाले. पण आता कारवाई करण्यात आली आहे आणि ही कारवाई खूपच जबरदस्त होती. त्यामुळे आता आम्ही सर्वपक्षीय बैठकीला जाणार आहोत, ही बैठक महत्त्वाची आहे, असे ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.
बिळातून बाहेर पडले, पाकिस्तानी सैन्य अधिकारी उघडपणे दहशतवाद्यांसोबत दिसले; हा घ्या
पहलगाममध्ये २२ एप्रिल रोजी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात २६ निरपराध लोकांचा मृत्यू झाला होता. अनेक माताभगिनींचे कुंकू (सिंदूर) त्या दिवशी पुसले गेले. भारताने ऑपरेशन सिंदूरद्वारे अवघ्या पंचवीस मिनिटांत पाकिस्तानातील नऊ ठिकाणचे दहशतवादी तळ क्षेपणास्त्रांचा मारा करीत उद्ध्वस्त केले, तसेच त्यातील १०० हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा केला. यानंतर देशभरातून आनंद, जल्लोष करण्यात आला. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत अभिनंदनाचा प्रस्ताव ठेवण्यात आला. याची माहिती राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना देण्यात आली. आता पुन्हा एकदा सर्वपक्षीय बैठक बोलावण्यात आली आहे. मागच्या सर्वपक्षीय बैठकीत ठाकरे गटाकडून कुणीही उपस्थित राहिले नव्हते. आता मात्र या सर्वपक्षीय बैठकीला ठाकरे गटाचे नेते उपस्थित राहणार आहेत. या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी आपली भूमिका मांडली.
काही चुकीचे नाही, आम्हाला स्वसंरक्षणाचा अधिकार आहे
भारतीय लष्कराने केलेल्या कारवाईचा अभिमान आहे. भारतीय लष्कर सक्षम आहे. आपल्या लष्कराला एक प्रतिष्ठा आहे. ते कुणावरही जाणूनबजून हल्ला करत नाहीत. तुम्ही आमच्या २६ भगिनींचे कुंकू पुसले म्हणून आम्ही प्रत्युत्तर दिले. आम्ही पाकिस्तानच्या नागरिकांवर किंवा लष्करी तळांवर हल्ला केलेले नाही, आम्ही पाकिस्तानमधील दहशतवादी ठिकाणांवर हल्ला केला आहे. त्यात काही चुकीचे नाही. आम्हाला स्वसंरक्षणाचा अधिकार आहे. यापुढेही अशा कारवाया झाल्या पाहिजेत, असे संजय राऊत यांनी सांगितले.
पाकिस्तानला कमी लेखता कामा नये
भारतीय लष्करासोबत आम्ही कायम आहोत. परंतु, पाकिस्तानचे चारित्र्य पाहता, त्यांना कमी लेखता कामा नये. त्यांचे देशात जे स्लीपर सेल आहेत, त्यांच्यावर नजर ठेवली पाहिजे. युद्धजन्य परिस्थिती देशातील अंतर्गत सुरक्षा अत्यंत महत्त्वाची असते. मुंबईसारख्या शहरांची सुरक्षितता महत्त्वाची आहे. गृहमंत्रालयाची ही जबाबदारी आहे, असे संजय राऊत यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पाकिस्तानी सैन्याने जम्मू आणि काश्मीरमधील नियंत्रण रेषेजवळील गावांना लक्ष्य करून जोरदार गोळीबार केला. यात सीमेवरील गावांतील चार मुलांसह १६ जण ठार आणि १५० जण जखमी झाले. यावर प्रतिक्रिया देताना संजय राऊत म्हणाले की, पाकिस्तानला युद्धच हवे असेल, तर भारतीय लष्कर सक्षम आहे. आम्ही युद्ध पुकारलेले नाही. आम्ही केवळ दहशतवादी ठिकाणांवर हल्ला केला आहे. युद्ध सुरू झाले असते, आता पाकिस्तान जगाच्या नकाशावर दिसला नसता. गेल्या ७० वर्षांपासून पाकिस्तान बदला घेण्याची भाषा करत आहे. पण पाकिस्तानची औकात काय हे आम्हाला माहिती आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
#WATCH | Shiv Sena (UBT) MP Sanjay Raut says, "Indian army's action against the terrorists in Pakistan is a matter of pride. The Indian army is a professional army, and it has a reputation for not attacking anyone without a reason, like Pakistan. You have killed 26 innocent… pic.twitter.com/Ig1snLXu5M
— ANI (@ANI) May 8, 2025