Tejas Mk1A: आता शत्रूची खैर नाही! 'गेमचेंजर' तेजस एमके१ए लवकरच भारतीय वायुसेनेत दाखल होणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2025 13:48 IST2025-10-10T13:47:57+5:302025-10-10T13:48:56+5:30
Indian Air Force: भारतीय वायुसेनेच्या ताफ्यात लवकरच स्वदेशी बनावटीचे आणि अत्यंत अत्याधुनिक तेजस Mk1A लढाऊ विमान दाखल होणार आहे.

Tejas Mk1A: आता शत्रूची खैर नाही! 'गेमचेंजर' तेजस एमके१ए लवकरच भारतीय वायुसेनेत दाखल होणार
भारतीय वायुसनेच्या ताफ्यात लवकरच स्वदेशी बनावटीचे आणि अत्यंत अत्याधुनिक तेजस Mk1A लढाऊ विमान दाखल होणार आहे. १७ ऑक्टोबर रोजी नाशिक येथील हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड सुविधेतून या विमानाचे पहिले उड्डाण होणार आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते हा ऐतिहासिक क्षण पार पडणार आहे.
तेजस Mk1A च्या पहिल्या उड्डाणासोबतच संरक्षण मंत्री राजनाथ सिंह नाशिकमध्ये आणखी दोन महत्त्वाच्या सुविधांचे उद्घाटन करणार आहेत. हिंदुस्तान टर्बो ट्रेनर (HTT-40) साठी दुसऱ्या उत्पादन लाइनचे देखील उद्घाटन करतील. यामुळे 'आत्मनिर्भर भारत' मोहिमेला बळ मिळणार असून, विमानांच्या निर्मितीला गती मिळेल. १७ ऑक्टोबरचा दिवस भारताच्या संरक्षण क्षेत्रासाठी आणि स्वदेशी निर्मितीसाठी एक अत्यंत अभिमानास्पद क्षण असेल.
६२ हजार ३७० कोटींचा ऐतिहासिक करार
तेजस Mk1A च्या समावेशाला संरक्षण मंत्रालयाच्या एका ऐतिहासिक कराराची पार्श्वभूमी आहे. संरक्षण मंत्रालयाने नुकताच HAL सोबत ६२ हजार ३७० कोटींचा मोठा करार केला आहे. या करारानुसार, भारतीय वायुसेनेला ९७ तेजस Mk1A विमाने (६८ सिंगल-सीट लढाऊ विमाने आणि २९ ट्विन-सीट ट्रेनर विमाने) मिळतील. हा करार 'मेक इन इंडिया' अभियानातील सर्वात महत्त्वाच्या टप्प्यांपैकी एक मानला जात आहे.
मिग-२१ ची जागा घेणार, हवाई दल होणार मजबूत
भारतीय वायुसेनेत जुन्या होत चाललेल्या मिग-२१ विमानांची जागा आता हे तेजस Mk1A घेईल. तेजस Mk1A हे केवळ स्वदेशी बनावटीचे नाही, तर ते अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे. यात इलेक्ट्रॉनिकली स्कॅन केलेले अॅरे (AESA) रडार, स्व-संरक्षण कवच आणि प्रगत नियंत्रण प्रणालींचा समावेश आहे. या नवीन विमानांच्या समावेशामुळे भारतीय वायुसेनेच्या स्क्वाड्रन ताकदीत लक्षणीय वाढ होणार आहे, ज्यामुळे शत्रूराष्ट्रांना एक मजबूत संदेश मिळेल.