हृदयद्रावक! यूट्यूबवर एअर शोचा Video पाहत होते विंग कमांडरचे वडील, मिळाली लेकाच्या मृत्यूची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2025 12:23 IST2025-11-22T12:21:47+5:302025-11-22T12:23:31+5:30
दुबई एअर शोमध्ये तेजस लढाऊ विमान अपघातात भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर नमांश स्याल यांचा मृत्यू झाला आहे.

हृदयद्रावक! यूट्यूबवर एअर शोचा Video पाहत होते विंग कमांडरचे वडील, मिळाली लेकाच्या मृत्यूची माहिती
दुबई एअर शोमध्ये तेजस लढाऊ विमानअपघातातभारतीय हवाई दलाचे विंग कमांडर नमांश स्याल यांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या वडिलांना यूट्यूबवरून या दुःखद घटनेची माहिती मिळाली. हिमाचल प्रदेशातील कांगडा येथील रहिवासी जगन्नाथ स्याल एअर शोशी संबंधित व्हिडीओ पाहत असताना अचानक त्यांना तेजस जेट क्रॅशची बातमी दिसली आणि काही क्षणातच त्यांचं हसतं-खेळतं घर उद्ध्वस्त झालं.
जगन्नाथ स्याल यांनी दिलेल्या माहितीनुसार, ते एक दिवस आधी त्यांच्या मुलाशी बोलले होते. नमांश यांनी त्यांना टीव्ही किंवा यूट्यूबवर त्याचा परफॉर्मन्स पाहण्यास सांगितलं होतं. दुपारी ४ वाजता व्हिडीओ पाहत असताना त्यांना क्रॅशची माहिती मिळाली. काही वेळातच सहा एअर फोर्स अधिकारी त्यांच्या घरी पोहोचले, ज्यामुळे त्यांना खात्री झाली की काहीतरी गंभीर घडलं आहे. नमांश यांचं कुटुंब सध्या कोइम्बतूरमध्ये आहे. त्यांची पत्नी कोलकाता येथे ट्रेनिंग घेत आहे, तर त्याचे पालक गेल्या दोन आठवड्यांपासून त्यांच्या ७ वर्षांची नात आर्याची काळजी घेत आहेत.
नमांश स्याल यांनी शिक्षण डलहौजी, आर्मी पब्लिक स्कूल, योल कॅन्ट, धर्मशाला आणि सैनिक स्कूल, सुजानपूर तिरामध्ये घेतलं. एनडीएमधून पदवी घेतल्यानंतर, ते २००९ मध्ये भारतीय हवाई दलात सामील झाले. वडिलांनी सांगितलं की, नमांश एक हुशार विद्यार्थी होते आणि नेहमीच मोठी स्वप्नं साध्य करण्याची आवड होती. या घटनेने आई वीणा सियालला मोठा धक्का बसला आहे. अधिकाऱ्यांनी कुटुंबाला याबाबत माहिती दिली आहे.
दुबईतील एअर शोमध्ये भारतीय हवाई दलाचे तेजस हे लढाऊ विमानही सहभागी झाले होते. चित्तथरारक प्रात्यक्षिक करून दाखवण्यासाठी ते आकाशात झेपावले होते. पण, कसरती करण्यापूर्वीच ते खाली कोसळले. ही घटना शुक्रवारी दुपारी २ वाजून १० मिनिटांनी घडली. एअर शोसाठी भारतीय हवाई दलाचे तेजस आणि सूर्यकिरण एरोबेटिक्स टीम गेल्या आठवड्यात अल मक्तोम हवाई तळावर दाखल झाली होती. तेजस लढाऊ विमानाचा हा दुसरा मोठा अपघात झाला आहे. यापूर्वी २०२४ मध्ये जैसलमैरजवळ तेजस विमान अपघातग्रस्त झाले होते.