लक्ष्य १०० अब्ज डॉलर व्यापाराचे! केवळ तेलविक्री नव्हे तर भारतातील वाहतूक व सेवेचा लाभ घेण्यास रशियन कंपन्या उत्सुक
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2025 10:41 IST2025-12-06T10:39:49+5:302025-12-06T10:41:47+5:30
२०३० सालापूर्वीच व्यापार उलाढालीचे लक्ष्य भारत-रशिया गाठणार,‘युरेशियन इकॉनॉमिक युनियन कराराची गरज, पुतीन यांच्या भारत दौऱ्याची सांगता

लक्ष्य १०० अब्ज डॉलर व्यापाराचे! केवळ तेलविक्री नव्हे तर भारतातील वाहतूक व सेवेचा लाभ घेण्यास रशियन कंपन्या उत्सुक
नवी दिल्ली : भारत-रशियाने लक्ष्य ठेवलेले १०० अब्ज डॉलर उलाढालीचे उद्दिष्ट्य २०३० सालापूर्वीच साध्य होईल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी व रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी शुक्रवारी व्यक्त केला. भारत-रशिया बिझनेस फोरमला संबोधित करताना मोदी यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी मागील वर्षी उल्लेख केलेल्या १० अब्ज डॉलर व्यापार उद्दिष्टाचा मुद्दा उपस्थित केला. त्यावर मोदी यांनी हे उद्दिष्ट २०३० सालीच साध्य होईल. यासाठी रशियाच्या उद्योजकांनी भारतात यावे, मेक इन इंडियातला मदत करावी, मेक इंडियात सहभागी व्हावे, असे आवाहन केले.
पुतीन यांनी आपल्या भाषणात हे उद्दिष्ट्य साध्य करण्यासाठी दोन्ही देशाच्या व्यापारी संघटनांनी एकत्र काम केले पाहिजे असे स्पष्ट केले. सध्या ही उलाढाल ७० अब्ज डॉलरची आहे. भारताने युरेशियन इकॉनॉमिक युनियनमध्ये भाग घेतल्यास प्रगतीला वेग येईल. रशियाचे शिष्टमंडळ केवळ ऊर्जेचा विषय चर्चेसाठी घेऊन आलेला नाही. तर रशिया तेल व नैसर्गिक वायू क्षेत्रात करार करण्यासाठी आला आहे. भारतातील वाहतूक आणि सेवेचा लाभ घेण्यासाठी रशियाच्या फर्म तयार असल्याचे पुतीन म्हणाले.
'ग्लोबल साउथ'च्या विकासात योगदान
भारत व रशिया हे त्यांच्या देशांतर्गत गरजा पूर्ण करू शकतात तसेच ते ग्लोबल साउथच्या विकासातही योगदान देऊ शकतात, असे मोदी म्हणाले. भारत स्वस्त व कार्यक्षम इलेक्ट्रिक वाहने, दुचाकी वाहने, सीएनजी वाहतूक यावर आघाडीवर आहे. तर रशिया प्रगत सामग्रीचा मोठा उत्पादक आहे. त्यामुळे ईव्ही उत्पादन, वाहनांचे सुटे भाग, आधुनिक तंत्रज्ञान यामध्ये दोन्ही देश स्वतःसोबत अन्य देशांच्या गरजा पूर्ण करू शकतात असे मोदी म्हणाले.
'विश्वास हाच पाया'
मोदी म्हणाले व्यापार असो वा मुत्सद्देगिरी कोणत्याही सहकार्याचा पाया हा परस्पर विश्वास असतो. भारत-रशिया व्यापारासाठी सुलभ व विश्वासार्ह व्यवस्था निर्माण करत आहे आणि भारत युरेशियन इकॉनॉमी युनियनशी मुक्त व्यापार करारावर चर्चा करत असल्याचे मोदी म्हणाले. भारत-रशिया संबंधांची सर्वात मोठी ताकद हाच विश्वास आहे. हाच विश्वास आमच्या सामायिक प्रयत्नांना दिशा देतो आणि गतीही प्रदान करतो, असे मोदी म्हणाले.
वाहतूक कॉरिडोर
भारत-रशियाने स्थिर व कार्यक्षम वाहतूक कॉरिडॉर तयार करण्यासाठी सहमती दर्शवली. त्यानुसार आंतरराष्ट्रीय उत्तर-दक्षिण वाहतूक कॉरिडॉर, चेन्नई-व्लादिवोस्तोक (पूर्वेकडील समुद्र) आणि नॉर्दन सी रूट या मार्गावर पायाभूत सुविधा क्षमता वाढवण्यात येतील.
व्यापार वृद्धीसाठी 'युइयु' करारावर स्वाक्षऱ्यांची गरज
भांडवल, व्यापार व सेवा यांच्यात गती येण्यासाठी भारत आणि 'युरेशियन इकॉनॉमिक युनियन'दरम्यान लवकर स्वाक्षऱ्या केल्यास तर भारत-रशियादरम्यानचा व्यापार सुलभ व वेगवान होईल असे प्रतिपादन पुतीन यांनी व्यक्त केले. 'युरेशियन इकॉनॉमिक युनियन'मध्ये रशिया, अर्मेनिया, बेलारूस, कझाकस्तान, किरगिझीस्तान असे पाच देश आहे. या पाच देशांशी सामाईक व्यापार व आर्थिक सहकार्य या करारामुळे शक्य होणार आहे.
कुडानकुलम अणुप्रकल्पाला रशियन कंपनीची मदत
भारतातील सर्वात मोठ्या कुडानकुलम अणुप्रकल्पातील अपुऱ्या अवस्थेतील अणुभट्ट्या उभ्या करण्यास रशिया मदत करणार आहे. या अणुप्रकल्पातील सहापैकी दोन भट्ट्या कार्यरत आहेत. उरलेल्या चार अणुभट्ट्या कार्यरत करण्याला रशिया प्राधान्य देणार आहे. या सहाही भट्ट्या कार्यरत झाल्यास भारताचे ऊर्जा निर्मितीत अनेक उद्दिष्ट्ये साध्य होतील असे पुतीन म्हणाले.
खर्गे, राहुल यांना नाही पण थरूर यांना निमंत्रण
पुतीन यांच्यासाठी राष्ट्रपती भवनात आयोजित केलेल्या खास भोजनात कॅबिनेटमधील मंत्री व विरोधी पक्षातील काँग्रेसचे लोकसभा खासदार शशी थरूर यांना निमंत्रण देण्यात आले होते. या निमंत्रणातून लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि राज्यसभेतील विरोधीपक्षनेते व काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना निमंत्रण देण्यात आले नव्हते. थरूर यांनी आपण परराष्ट्र संसदीय समितीचे अध्यक्ष असल्याने निमंत्रण स्वीकारल्याचे सांगितले.
- पुतीन यांचे शुक्रवारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रपती भवनात स्वागत केले. यावेळी पुतीन यांना लष्कराच्या तिन्ही दलाकडून मानवंदना देण्यात आली.
- त्यानंतर पुतीन यांनी राष्ट्रपिता म. गांधी यांच्या राजघाट येथील समाधीला भेट देऊन त्यांना अभिवादन केले. पुतीन यांनी येथे अभ्यागत कक्षात जाऊन स्वतःची स्वाक्षरीही केली.
- मोदी यांनी रशियन भाषेतील भगवद्गीतेची एक प्रत पुतीन यांना भेट दिली. तसेच महाराष्ट्रातील चांदीच्या कलाकुसरीतला घोडा, मुर्शिदाबादचा चहाचा सेट, आग्र्यातील प्रसिद्ध संगमरवर धातूचा बुद्धिबळपट, आसाममधील काळा चहा आणि काश्मीरचे केशर भेट दिले.