बेपर्वाईने गाडी चालवणे आत्ताच थांबवा, मृत्यू झाल्यास नातेवाईकांना इन्शुरन्सचा एकही रुपया मिळणार नाही!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2025 08:47 IST2025-07-03T08:46:47+5:302025-07-03T08:47:47+5:30
Supreme Court: स्वतःच्या चुकीमुळे जीव गमावणाऱ्यांना विमा कंपनी भरपाई देण्यास बांधील नाही, असा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला आहे.

बेपर्वाईने गाडी चालवणे आत्ताच थांबवा, मृत्यू झाल्यास नातेवाईकांना इन्शुरन्सचा एकही रुपया मिळणार नाही!
बेपर्वाईने गाडी चालवणाऱ्यांसाठी सुप्रीम कोर्टाने मोठा निर्णय दिला. स्वतःच्या चुकीमुळे जीव गमावणाऱ्यांना विमा कंपनी भरपाई देण्यास बांधील नाही, असे कोर्टाचे म्हटले आहे. रस्ता अपघातात मरण पावलेल्या व्यक्तीच्या पालकांना दिलासा देण्यास कोर्टाने नकार दिला आहे.
१८ जून २०१४ रोजी, एनएस रवीश हे त्यांचे वडील, बहीण आणि मुले यांच्यासह कारने प्रवास करत असताना मालनहल्लीजवळ त्यांचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि अपघात झाला. या अपघातात त्यांचा मृत्यू झाला. मिडिया रिपोर्टनुसार, रवीश वेगाने गाडी चालवत होता, त्यामुळे हा अपघात झाला. मल्लासंद्रा गावापासून अरासीकेरेदरम्यान हा अपघात झाला.
या अपघातात रवीश यांचा मृत्यू झाला. त्यानंतर रविशची पत्नी, मुलगा आणि पालकांनी विमा कंपनीकडे ८० लाख रुपयांची भरपाईची मागणी केली. पोलिसांनी आरोपपत्रात रवीश हा बेपर्वाईने गाडी चालवत असल्यामुळे हा अपघात झाल्याचे नमूद करण्यात आले. मोटार अपघात न्यायाधिकरणाने रवीशच्या कुटुंबाचा दावा फेटाळून लावला.
नंतर, त्यांनी कर्नाटक हायकोर्टात धाव घेतली आणि दावा केला की हा अपघात टायर फुटल्यामुळे झाला. यावर हायकोर्टाने म्हटले की, "मृत व्यक्तीच्या कायदेशीर प्रतिनिधीच्या वतीने दावा केला जातो, तेव्हा हे सिद्ध करणे आवश्यक आहे की मृत व्यक्ती निष्काळजीपणे गाडी चालवण्यास जबाबदार नाही. हा अपघात वेगवान आणि निष्काळजीपणे गाडी चालवल्यामुळे झाला आणि त्यानेच स्वतःचे नुकसान केले. त्यामुळे मृताचे कुटुंबीय विमा कंपन्यांकडे भरपाईचा दावा करू शकत नाहीत."
सुप्रीम कोर्टाचा कुटुंबियांना दिलासा देण्यास नकार
न्यायाधीश पीएस नरसिंह आणि न्यायमूर्ती आर महादेवन या याचिकेवर सुनावणी केली. त्यांनी मृताच्या कुटुंबाला दिलासा दिला नाही. खंडपीठाने म्हटले की, स्वत: चुकीमुळे अपघात होतो, तेव्हा मृताचे कुटुंबीय विमान कंपनीकडे भरपाई मागू शकत नाहीत.