३५ लाख आणि ३७५० चौरस फूट भूखंड... महिला हॉकी खेळाडूंना सोरेन सरकारकडून मोठं गिफ्ट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2025 12:56 IST2025-01-30T12:56:02+5:302025-01-30T12:56:36+5:30

मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी भूखंड देण्यासोबतच, राज्य सरकार क्रीडा धोरणांतर्गत सलीमा टेटे आणि निक्की प्रधान या दोन्ही खेळाडूंना त्यांच्या स्वप्नातील घर बांधण्यासाठी प्रत्येकी ३५ लाख रुपये देण्याची घोषणाही केली आहे.

Star Girl Hockey Player Salima Tete and Nikki Pradhan get land and 35 lakh each Jharkhand government, Ranchi | ३५ लाख आणि ३७५० चौरस फूट भूखंड... महिला हॉकी खेळाडूंना सोरेन सरकारकडून मोठं गिफ्ट!

३५ लाख आणि ३७५० चौरस फूट भूखंड... महिला हॉकी खेळाडूंना सोरेन सरकारकडून मोठं गिफ्ट!

हॉकीमध्ये चांगली कामगिरी करून राज्याचे आणि देशाचे नाव उंचावणाऱ्या दोन महिला खेळाडूंना झारखंडमधील हेमंत सोरेन सरकारकडून मोठं गिफ्ट मिळालं आहे. मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या उपस्थितीत झारखंड सचिवालयात आयोजित कार्यक्रमात ऑलिंपिक हॉकी खेळाडू सलीमा टेटे आणि निक्की प्रधान यांना रांचीतील हरमू येथील निवासी वसाहतीत प्रत्येकी ३७५० चौरस फूट भूखंडाची (जमीन) कागदपत्रे सुपूर्द करण्यात आली.

मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी भूखंड देण्यासोबतच, राज्य सरकार क्रीडा धोरणांतर्गत सलीमा टेटे आणि निक्की प्रधान या दोन्ही खेळाडूंना त्यांच्या स्वप्नातील घर बांधण्यासाठी प्रत्येकी ३५ लाख रुपये देण्याची घोषणाही केली आहे. या घोषणेनंतर, दोन्ही स्टार हॉकी खेळाडूंनी मुख्यमंत्री हेमंत सोरेन आणि संपूर्ण सरकारचे आभार मानले. या दोन्ही स्टार हॉकी खेळाडूंना हरमू हाऊसिंग कॉलनीतील प्लॉट क्रमांक १० (ब) आणि १० (अ) मध्ये प्रत्येकी ३७५० चौरस फूटचे भूखंड देण्यात आले.

दरम्यान, झारखंडमधील सिमडेगा जिल्ह्यातील रहिवासी स्टार हॉकी खेळाडू सलीमा टेटे हिला अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. सलीमा टेटे हिचा जन्म २६ डिसेंबर २००१ रोजी सिमडेगा जिल्ह्यातील पिथरा पंचायतीतील बडकी छपर गावात झाला. अत्यंत गरिबीत वाढलेली सलीमा टेटे लाकडी काठीने हॉकीचा सराव करायची, मात्र आज तिची गणना जगातील स्टार हॉकीपटूंमध्ये केली जाते.

याचबरोबर, भारतीय महिला हॉकी संघाची खेळाडू निक्की प्रधान हिचा जन्म ८ डिसेंबर १९९३ रोजी झारखंडमधील खुंटी जिल्ह्यातील हेसल गावात झाला. निक्की प्रधानचे वडील सोमा प्रधान बिहार पोलिसात कॉन्स्टेबल होते आणि तिची आई जितन देवी गृहिणी आहे. निक्की प्रधान ही झारखंडमधील पहिली महिला हॉकी खेळाडू आहे, जिने ऑलिंपिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले होते.

Web Title: Star Girl Hockey Player Salima Tete and Nikki Pradhan get land and 35 lakh each Jharkhand government, Ranchi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.