सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग, शिवसेनेशिवाय सत्ता; मुख्यमंत्र्यांचे संकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2019 06:50 AM2019-11-05T06:50:34+5:302019-11-05T06:51:07+5:30

फॉर्म्युल्याबाबत भाजप-शिवसेनेची सावध भूमिका : सरकारबाबत पवारांकडूनही सस्पेन्स कायम

Speed up the establishment of power, power without the Shiv Sena; Hints of CM fadanvis | सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग, शिवसेनेशिवाय सत्ता; मुख्यमंत्र्यांचे संकेत

सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग, शिवसेनेशिवाय सत्ता; मुख्यमंत्र्यांचे संकेत

Next

नवी दिल्ली/मुंबई : महाराष्ट्रात सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आला असून सोमवारी दिवसभर राजधानी दिल्लीत राजकीय खलबतं झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, राज्य प्रभारी भूपेंद्र यादव, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन सरकार स्थापनेसंदर्भात रणनिती निश्चित केली. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रेस पक्षाच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेऊन महाराष्ट्रातील राजकीय सद्यस्थितीवर चर्चा केली.

दिल्लीत पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी, महाराष्ट्राला नव्या सरकारची आवश्यकता आहे आणि ते लवकरच बनेल, एवढेच सांगितले. मात्र युतीचे सरकार येणार की भाजप स्वबळावर सरकार स्थापन करणार या बाबतची संदिग्धता कायम ठेवली. फडणवीस यांच्या विधानावरून भाजप आता शिवसेनेशिवाय सत्ता स्थापन करू शकतो, असे म्हटले जात आहे. 

शिवसेनेकडून मुख्यमंत्री पदाचा आग्रह धरला जात आहे. या आग्रहाला दाद न देण्याचा सल्ला अमित शहा यांनी फडणवीस यांना आजच्या भेटीत दिला आणि म्हणूनच फडणवीस यांनी बैठकीतून बाहेर पडताच केलेल्या विधानात शिवसेनेचा उल्लेख टाळला, असे म्हटले जात आहे.
शिवसेनेने अधिक ताणून धरल्याने शिवसेनेला काय द्यायचे, यावर फडणवीस व शहा यांच्यात चर्चा झाली. मुख्यमंत्रीपद, गृह व नगरविकास, वित्त खाते भाजपने सोडायचे नाही, यावर दोन्ही नेत्यांमध्ये तूर्त एकमत झाल्याचे समजते. त्यामुळे शिवसेनेच्या वाट्याला महसूल खाते जाण्याची शक्यता आहे.
शिवसेनेला उपमुख्यमंत्रीपद द्यायचे झाल्यास भाजपचा एक उपमुख्यमंत्री करून सेनेला शह द्यायचा काय? यावरही चर्चा झाली. परंतु अशाने सरकारच्या स्थैर्यावर प्रतिकूल परिणाम होईल, यामुळे हा फॉर्म्युला सावधपणे स्वीकारला जाण्याची शक्यता आहे. येत्या ९ नोव्हेंबरपर्यंत नवे सरकार स्थापन होणे आवश्यक असून येत्या दोन दिवसातच फडणवीस राज्यपालांकडे तसा दावा करतील, असे बोलले जाते.
कोण काय बोलले, हे महत्त्वाचे नाही- फडणवीस
गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेकडून शाब्दिक हल्ले होत असले तरी मुख्यमंत्र्यांनी ते फारसे गंभीरपणे घेतले नसल्याचे दिल्लीवारीत दिसून आले. सत्तेच्या समीकरणात कोण काय बोलले, याला फारसे महत्त्व नसते. कोण काय टिप्पणी करीत आहे, यावर आपण भाष्य करणार नाही. त्याप्रमाणे भाजपचे नेतेही यावर प्रतिक्रिया देणार नाहीत, असे फडणवीस यांनी सांगितले.
‘त्या’ फाईलमध्ये दडलंय काय?
राज्यपालांच्या भेटीदरम्यान राऊत आणि कदम यांच्यासोबत एक फाईल देखील होती. पत्रकार परिषदेत या फाईलविषयी विचारल्यानंतर राऊतांनी लागलीच आपल्या सुरक्षारक्षकांना ती फाईल गाडीत ठेवायला लावली. त्यामुळे या फाईलवर चर्चा रंगली. दुर्दैवाने ती फाईल समोर आली आहे. फाईलमध्ये काय आहे याचा लवकरच खुलासा करु, असेही राऊत म्हणाले.

मुख्यमंत्र्यांनी घेतली गडकरींची भेट
फडणवीस यांनी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी जाऊन सायंकाळी भेट घेतली. ही भेट राजकीय वर्तुळात महत्त्वाचे मानले जात आहे. सत्तास्थापनेचा तिढा सोडविण्यासाठी समोर येऊन गडकरी काही भूमिका निभावू शकतात आणि त्या संदर्भात ही भेट होती, असेही म्हटले जाते.

शिवसेनेचे ‘फटकारे’ आणि ‘पाहावा विठ्ठल’
शिवसेना नेते खा. संजय राऊत आणि पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी राजभवनात जाऊन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली.
उभयतांनी राज्यपालांना बाळासाहेब ठाकरे यांचे ‘फटकारे’ आणि उद्धव ठाकरे यांची ‘पाहावा विठ्ठल’ आणि ‘महाराष्ट्र माझा’ हे गडकिल्ल्यांबाबतचे पुस्तक भेट दिले. या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना राऊत यांनी ही सदिच्छा भेट असल्याचा दावा केला. यावेळी कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही.
आम्ही आमची भूमिका मांडली आहे. सरकार स्थापनेत शिवसेना अडथळा ठरत नाही. त्यामुळे लवकरात लवकर सरकार स्थापन व्हावी ही मागणी केल्याचे त्यांनी सांगितले.

उपमुख्यमंत्री आणि १६ मंत्रिपदे
शिवसेनेला उपमुख्यमंत्री पदासह १६ मंत्रिपदे देण्याच्या प्रस्तावात कोणताही बदल करायचा नाही. नगरविकास, वित्त, गृह अशी महत्त्वाची खातीही द्यायची नाहीत.

येत्या दोन दिवसांत शिवसेनेकडून या संदर्भात अनुकूल प्रतिसाद मिळाला तर ठीक नाहीतर स्वबळावर सत्ता स्थापण्याचा पर्याय कायम ठेवा आणि ‘प्लान बी’ची तयारी करा, असे फडणवीस यांना पक्षनेतृत्वाकडून सांगण्यात आल्याची माहिती आहे.

Web Title: Speed up the establishment of power, power without the Shiv Sena; Hints of CM fadanvis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.