जम्मू काश्मीरमध्ये पाकिस्तानने दहशतवादी हल्ला केल्यानंतर भारताने मोठ्या कारवाईची तयारी सुरु केली आहे. मंगळवारी भारत सरकारने सैन्याच्या तिन्ही दलांना कारवाई कशी करणार, कधी करणार याची निवड करण्यासाठी फ्री हँड दिला आहे. यामुळे पाकिस्तानमध्ये एलओसीपर्यंत काल रात्रीपासूनच लढाऊ विमाने घिरट्या घालत होती. गेल्याच आठवड्यात भारताविरोधात गरळ ओकणारा पाकिस्तानचा लष्कर प्रमुख देश सोडून गेला किंवा बंकरमध्ये लपला असल्याचे दावे केले जात आहेत. अशातच येत्या काही दिवसांत काहीतरी मोठे होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...
येत्या ९ मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे रशियाच्या विजय दिवसाला प्रमुख पाहुणे म्हणून जाणार होते. यानंतर रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन भारताच्या दौऱ्यावर येणार होते. परंतू, पुतीन यांचे खास असलेले प्रेस सचिव दिमित्री पेस्कोव यांनी पंतप्रधान मोदी यांनी रशियाचा आगामी दौरा रद्द केला असल्याची माहिती दिली आहे. मोदी येत्या विजय दिवसाला येणार नसल्याचे पेस्कोव यांनी म्हटले आहे.
हा दौरा रद्द झाल्याचे भारताने नाही तर रशियाने जाहीर केले आहे, यातही बरेच काही आले आहे. हा दौरा रद्द होण्यामागचे कारण रशियाने दिलेले नाही. भारताकडून यावर कोणताही प्रतिक्रिया आलेली नाहीय. दुसऱ्या महायुद्धात रशियाने जर्मनीवर मिळवलेल्या विजयाच्या ८० व्या वर्धापन दिनानिमित्त ९ मे रोजी होणाऱ्या विजय दिनाच्या परेडला उपस्थित राहण्यासाठी पंतप्रधान मोदींना आमंत्रित करण्यात आले होते. ९ मे रोजी सेनापती-प्रमुखांनी जर्मनीच्या बिनशर्त आत्मसमर्पणाच्या कायद्यावर स्वाक्षरी केली आणि युद्ध संपले होते.
मोदी काय तयारी करतायत...पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात आज चार महत्वाच्या बैठका होणार आहेत. या बैठकांना तिन्ही सैन्य दलांचे अधिकारी, मंत्री, सुरक्षा सल्लागार आदी उपस्थित राहणार आहेत. आज केंद्र सरकारने राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळाची पुनर्रचना करण्यात आली. यात रॉचे माजी प्रमुख आलोक जोशी यांची राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळाचे प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मंगळवारी सायंकाळी झालेल्या बैठकीत मोदींनी सैन्याला फ्री हँड देण्याचा निर्णय घेतला आहे.