गायिका मैथिली ठाकूर भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवणार? विनोद तावडेंची घेतली भेट
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2025 14:55 IST2025-10-06T14:53:08+5:302025-10-06T14:55:17+5:30
Maithili Thakur Bihar Election 2025: प्रसिद्ध गायिका मैथिली ठाकूर बिहार विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची चर्चा आहे. मैथिली ठाकूरने भाजपचे बिहारचे प्रभारी विनोद तावडे यांची भेट घेतली.

गायिका मैथिली ठाकूर भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवणार? विनोद तावडेंची घेतली भेट
Maithili Thakur BJP News: गायिका मैथिली ठाकूर भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. भाजपचे बिहार प्रभारी विनोद तावडे आणि केंद्रीय मंत्री नित्यानंद राय यांची भेट घेतली. विनोद तावडे यांनीही एक पोस्ट लिहित याबद्दलचे संकेत दिले. मैथिली ठाकूर बदलणाऱ्या बिहारचा वेग बघून पुन्हा बिहारमध्ये येऊ इच्छिते, असे विनोद तावडे म्हणाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, गायिका मैथिली ठाकूर लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार आहे. बिहारमधील दरभंगा जिल्ह्यातील अलिनगर विधानसभा मतदारसंघातून ती निवडणूक लढवणार असल्याचा अंदाज आहे. विनोद तावडे आणि केंद्रीय मंत्री नित्यानंद राय यांच्या भेटीनंतर या चर्चेला हवा मिळाली आहे.
मैथिली ठाकूरच्या भेटीनंतर तावडे काय म्हणाले?
बिहारचे प्रभारी विनोद तावडे यांनी मैथिली ठाकूरच्या भेटीनंतर एक पोस्ट लिहिली आहे. तावडेंनी म्हटले आहे की, "१९९५ साली बिहारमध्ये लालू राज आल्यामुळे जे कुटुंब बिहार सोडून गेले होते; त्या कुटुंबातील मुलगी सुप्रसिद्ध गायिका मैथिली ठाकूर बदलत्या बिहारच्या विकासाचा वेग बघून पुन्हा बिहारला येऊ इच्छिते आहे."
"आज केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय आणि मी तिला आग्रह केला की, बिहारच्या जनतेसाठी आणि बिहारच्या विकासात तुमचं योगदान असावं, असं बिहारच्या सामन्य माणसाला वाटतं आणि त्यांच्या अपेक्षा पूर्ण कराव्यात", असे म्हणत तावडेंनी मैथिली ठाकूरच्या भाजप प्रवेशाचे संकेत दिले आहेत.
मैथिली ११व्या वर्षापासून संगीत क्षेत्रात
मधुबनी जिल्ह्यातील बेनीपट्टीची रहिवाशी असलेली मैथिली ठाकूर याच वर्षी जुलैमध्ये २५ वर्षांची झाली आहे. २०११ मध्ये तिने ११ वर्षांची असताना संगीत क्षेत्रात पाऊल ठेवले होते. सारेगामापा लिटिल चॅम्प्समधून तिने ओळख मिळवली आणि आपली वाटचाल सुरू ठेवली. भावगीते, भजने, लोकगीतांचे कार्यक्रम ती करते.