"मी गरीब आहे, मला डॉक्टर व्हायचंय..."; मुख्यमंत्र्यांना भेटता न आल्याने विद्यार्थिनीला कोसळलं रडू
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2026 09:45 IST2026-01-10T09:44:28+5:302026-01-10T09:45:26+5:30
एका गरीब आदिवासी कुटुंबातील मुलगी मुख्यमंत्र्यांकडे मदतीची साद घालण्यासाठी पोहोचली होती. मात्र, जेव्हा तिची मुख्यमंत्र्यांशी भेट होऊ शकली नाही, तेव्हा तिला अश्रू अनावर झाले.

फोटो - आजतक
मध्य प्रदेशातील सीधी जिल्ह्यात एका गरीब आदिवासी कुटुंबातील मुलगी मुख्यमंत्र्यांकडे मदतीची साद घालण्यासाठी पोहोचली होती. मात्र, जेव्हा तिची मुख्यमंत्र्यांशी भेट होऊ शकली नाही, तेव्हा तिला अश्रू अनावर झाले. बहरी येथे आयोजित मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात आपल्या शिक्षणासाठी आणि भविष्यासाठी मदत मागण्यासाठी आलेली ही विद्यार्थिनी मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचू शकली नाही. त्यानंतर निराश झालेल्या विद्यार्थिनीला रडू कोसळलं.
ही विद्यार्थिनी सीधी जिल्ह्यातील आदिवासी बहुल चिनगवाह गावाची रहिवासी असून 'बैगा' समुदायातील आहे. अनामिका असं या विद्यार्थिनीचं नाव आहे. हातात अर्ज घेऊन ती मुख्यमंत्र्यांना भेटण्याचा प्रयत्न करत होती, परंतु कडक सुरक्षा व्यवस्था आणि कार्यक्रमाच्या व्यस्ततेमुळे तिला मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली नाही.
रडत रडत अनामिका म्हणाली की, मी गरीब आहे. माझं स्वप्न डॉक्टर बनण्याचं आहे. मला शिकून समाज आणि देशाची सेवा करायची आहे, परंतु माझ्या कुटुंबाची आर्थिक स्थिती अत्यंत हलाखीची आहे. वडील मजुरी करतात, ज्यातून घराचा खर्च चालवणंही कठीण होतं. अशा परिस्थितीत मेडिकलसारख्या महागड्या शिक्षणाचं स्वप्न दुरावत चालले आहे.
अनामिका पुढे म्हणाली, "मला शिकायचं आहे, डॉक्टर व्हायचं आहे, पण पैसे नाहीत. वडील मजुरी करतात. शिक्षणाचा खर्च कुठून येणार, हीच चिंता मला रोज सतावतेय." आपल्या शिक्षणासाठी यापूर्वीही अनेकवेळा मदतीची याचना केली आहे. सीधी जिल्ह्याचे धौहनी क्षेत्रीय आमदार, खासदार आणि जिल्हाधिकाऱ्यांचीही भेट घेतली, परंतु आतापर्यंत तिला कोणतीही आर्थिक मदत मिळू शकलेली नाही.
शेवटची आशा घेऊन ती मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात पोहोचली होती. मुख्यमंत्र्यांना भेटल्यास शिष्यवृत्ती, आर्थिक मदत किंवा एखाद्या सरकारी योजनेचा लाभ मिळेल आणि मेडिकलच्या शिक्षणाचे स्वप्न पूर्ण होईल, अशी तिला आशा होती. कार्यक्रमस्थळी ही विद्यार्थिनी बराच वेळ महिला पोलिसांकडे मुख्यमंत्र्यांना भेटू देण्याची विनवणी करत होती. पोलिसांनी तिची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, पण सुरक्षा प्रोटोकॉलमुळे तिला पुढे जाऊ दिलं नाही. याच दरम्यान व्यासपीठापासून दूर उभी असलेली अनामिका खचली आणि रडू लागली.