shivsena demands bharatratna for veer savarkar | स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न द्या, शिवसेना खासदाराची मागणी
स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न द्या, शिवसेना खासदाराची मागणी

ठळक मुद्देस्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न द्या अशी मागणी शिवसेना खासदार राजेंद्र गावित यांनी केली आहे. गुरुवारी (21 नोव्हेंबर) गावित यांनी लोकसभेत ही मागणी केली आहे.'बिरसा मुंडा आणि वीर सावरकर या दोघांनाही भारतरत्न पुरस्कार देऊन भारतरत्न पुरस्काराचा गौरव वाढवावा'

नवी दिल्ली - स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न द्या अशी मागणी शिवसेना खासदार राजेंद्र गावित यांनी केली आहे. गुरुवारी (21 नोव्हेंबर) गावित यांनी लोकसभेत ही मागणी केली आहे. 'महोदय, बिरसा मुंडा आणि वीर सावरकर या दोघांनाही भारतरत्न पुरस्कार देऊन भारतरत्न पुरस्काराचा गौरव वाढवावा अशी मागणी करतो' असं राजेंद्र गावित यांनी म्हटलं आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीवेळी भाजपाने प्रसिद्ध केलेल्या जाहीरनाम्यात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना भारतरत्न देण्यासाठी शिफारश करु असं आश्वासन दिलं होतं. मात्र मंगळवारी (19 नोव्हेंबर) लोकसभेत केंद्र सरकारकडून यावर स्पष्टीकरण आलं. गृह मंत्रालयाने सांगितले की, भारतरत्न देण्यासाठी शिफारश येत राहतात. मात्र त्यासाठी कोणत्याही औपचारिक शिफारशींची गरज भासत नाही. भारतरत्नबाबतचा निर्णय सरकार योग्य वेळी घेईल असं केंद्राकडून सांगण्यात आलं आहे. भारतरत्न देशाचा सर्वोच्च सन्मान आहे. पंतप्रधान या नावासाठी राष्ट्रपतींकडे प्रस्ताव पाठविते. यंदाच्या महाराष्ट्राच्या निवडणुकीवेळी भाजपाने त्यांच्या जाहीरनाम्यात हे आश्वासन दिलं होतं. मात्र शिवसेनेने मुख्यमंत्रिपदावरुन भाजपापासून वेगळी झाली त्यामुळे भाजपाचं सरकार महाराष्ट्रात स्थापन होऊ शकलं नाही. 

हिंदुत्ववादी विचारधारेचे वीर सावरकर हे हिंदू महासभेशी जोडलेले होते. महाराष्ट्रात त्यांचे नाव आदराने घेतले जाते. हिंदुत्व विचारधारेशी जोडलेले राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटना सावरकरांना आपला आदर्श मानतात. सावरकरांचे पणतु रणजीत सावरकर यांनी असंही सांगितलं होतं की, इंदिरा गांधी सावरकर समर्थक होत्या. इंदिरा गांधींनी पाकिस्तानला गुडघ्यावर टेकायला भाग पाडलं. लष्कर आणि परराष्ट्र धोरण मजबूत केलं असा दावा त्यांनी केला होता. 

मात्र भाजपाने जाहीरनाम्यात वीर सावरकरांसाठी ‘भारतरत्न’साठी शिफारस करू असे आश्वासन निवडणूक जाहीरनाम्यात द्यायचे? हे बरोबर नाही. सावरकर हे जगभरातील क्रांतिकारकांचे ‘नायक’ होते. ते तसेच राहतील. त्यांना ‘भारतरत्न’ द्यावे ही देशाची इच्छा आहे. तो देशाचा बहुमान ठरेल अशा शब्दात शिवसेनेने भाजपाच्या जाहिरनाम्यावर नाराजी व्यक्त केली होती. तर आम्ही वीर सावरकरांना भारतरत्न देण्याची शिफारस करू त्यासाठी भाजपला मतदान करा असे भाजपच्या जाहीरनाम्यात सांगितले आहे. भाजपच्या जाहीरनाम्यात असा संदर्भ येणे हे क्लेशदायक आहे असा टोला शिवसेनेने भाजपाला लगावला होता. 

तसेच काँग्रेस नेते आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबतची आपली भूमिका स्पष्टपणे मांडली होती. ''काँग्रेस पक्ष हा स्वातंत्र्यवीर सावरकरविरोधी नाही. सावरकरांबाबत आम्हाला आदरच आहे. स्वत: इंदिरा गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या स्मृतिप्रित्यर्थ काढण्यात आलेल्या टपाल तिकीटाचे अनावरण केले होते.'' असे मनमोहन सिंह यांनी सांगितलं होतं. 

 

Web Title: shivsena demands bharatratna for veer savarkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.