Shashi Tharoor: पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानचा दहशतवादी चेहरा जगासमोर आणण्यासाठी केंद्र सरकारने विविध पक्षातील खासदारांचे शिष्टमंडळ विविध देशांमध्ये पाठवले आहे. काँग्रेस नेते शशी थरुरदेखील यापैकी एका शिष्टमंडळाचा भाग असून, ते परदेशात भारताची बाजू भक्कमपणे मांडत आहेत. पण, आता त्यांना त्यांच्याच पक्षातील नेत्याकडून टीकेचा सामना करावा लागत आहे.
काँग्रेस नेते उदित राज यांनी शशी थरुर यांना चक्क भाजपचा सुपर प्रवक्ता म्हटले आहे. ते म्हणाले की, पूर्वी सर्जिकल स्ट्राइक व्हायची, पण सामान्यांना माहितीही होत नव्हती. मोदींसारखे नाही की, करणार तर काहीच नाही अन् स्वतःची बढाई मारण्यात पुढे. हे सैन्याच्या कारवाईचा फायदा घेत आहेत. कांग्रेस पार्टीने असे कधीही केले नाही. ते करत आहेत, त्यात सैन्याचा आदर नाही. हा शशी थरूर यांचा पब्लिसिटी स्टंट आहे. ते आता भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते बनले आहेत, अशी टीका त्यांनी केली.
दहशतवाद्यांना याची किंमत मोजावी लागेलशशी थरुर यांनी दहशतवादी कारवायांसाठी पाकिस्तानवर जोरदार टीका केली. पनामा येथे एका शिष्टमंडळाचे नेतृत्व करताना थरूर म्हणाले की, पाकिस्तानने भारतीय भूभागाला लक्ष्य करून दहशतवादी कारवाया सुरू ठेवल्या. पण, आता दहशतवाद्यांना किंमत चुकवावी लागेल. सप्टेंबर 2016 मध्ये उरी येथे सर्जिकल स्ट्राईक करून भारत आणि पाकिस्तानमधील नियंत्रण रेषेचे पहिल्यांदाच भारताने उल्लंघन केले. यापूर्वी असे कधीही केले गेले नव्हते. कारगिल युद्धादरम्यानही भारताने नियंत्रण रेषा ओलांडली नव्हती.
जानेवारी 2019 मध्ये पुलवामा हल्ला झाला, तेव्हा आम्ही केवळ नियंत्रण रेषाच नाही, तर आंतरराष्ट्रीय सीमा देखील ओलांडली आणि बालाकोटमधील दहशतवादी मुख्यालयावर हल्ला केला. यावेळी आम्ही त्या दोन्हीही पलीकडे गेलो आहोत. आम्ही केवळ नियंत्रण रेषाच नाही तर आंतरराष्ट्रीय सीमेवरही हल्ला केला. आम्ही दहशतवादी अड्डे, प्रशिक्षण केंद्रे आणि दहशतवादी मुख्यालयांवर हल्ला करून पाकिस्तानला धडा शिकवला, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केले.