स्वतःहून ओटीपी दिला, आता बँकेला दोष देऊ नका; फसवणूक झालेल्या ग्राहकाची तक्रार फेटाळली!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2026 15:26 IST2026-02-05T15:22:08+5:302026-02-05T15:26:07+5:30
Cyber Fraud: ग्राहकानेच निष्काळजीपणा केल्याचे नमुद करत सव्वा लाखांच्या फसवणुकीची तक्रार ग्राहक आयोगाने फेटाळली.

स्वतःहून ओटीपी दिला, आता बँकेला दोष देऊ नका; फसवणूक झालेल्या ग्राहकाची तक्रार फेटाळली!
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई: ऑनलाइन फसवणुकीत तब्बल १.२५ लाख रुपयांहून अधिक रक्कम गमावलेल्या मुंबईतील एका रहिवाशाने दाखल केलेली तक्रार ग्राहक आयोगाने फेटाळली. तक्रारदाराने स्वत:च फसवणूक करणाऱ्यांना वन-टाइम पासवर्ड (ओटीपी) दिला. त्यामुळे या प्रकरणात ग्राहकाचा निष्काळजीपणा अधोरेखित होतो, अशा परिस्थितीत बँकेला दोष देता येत नाही, असे आयोगाने स्पष्ट केले.
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग (उपनगर)चे अध्यक्ष प्रदीप कडू आणि सदस्य गौरी एम. कापसे यांनी गेल्या महिन्यात दिलेल्या आदेशात तक्रारदार फसवणुकीला बळी पडल्याचे स्पष्ट केले. मात्र, आरबीआयने स्पष्ट मार्गदर्शक तत्त्वे दिली आहेत. त्यानुसार ग्राहकाच्या निष्काळजीपणामुळे नुकसान झाले असल्यास संपूर्ण नुकसान ग्राहकानेच सहन करावे, असे आयोगाने नमूद केले.
जानेवारी २०२२ मध्ये नेटफ्लिक्सचे सदस्यत्व नूतनीकरण करण्याचा प्रयत्न करत असताना त्याला ई-मेलद्वारे आलेल्या एका लिंकवर त्याने क्लिक केले. तो ई-मेल नेटफ्लिक्सकडून आलेला नाही, हे त्याच्या लक्षात आले नाही. त्याने त्या लिंकवर क्लिक करून आपली कार्डची माहिती व एचडीएफसीबँकेकडून आलेला ओटीपी भरला. काही सेकंदांतच बँकेकडून १,२५,६६५ रुपयांच्या व्यवहाराची पुष्टी करणारा एसएमएस मिळाला. नेटफ्लिक्सचे सदस्यत्व शुल्क केवळ ७९९ रुपये होते. त्यामुळे आपण सायबर फसवणुकीचा बळी पडलो असल्याचे लक्षात येताच त्याने तत्काळ बँक आणि पोलिसांच्या सायबर सेलशी संपर्क साधला.
ग्राहक आयोग काय म्हणाले?
आयोगाने तक्रारदाराची फसवणूक झाल्याचे मान्य केले. मात्र, तक्रारदाराने स्वत:च फसवणूक करणाऱ्यांना ‘गोपनीय तपशील’(ओटीपी) दिल्याचे अधोरेखित केले. रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार ग्राहकाच्या निष्काळजीपणामुळे नुकसान झाले असल्यास संपूर्ण नुकसान ग्राहकानेच सहन करावे लागते, असे आयोगाने नमूद केले. त्यामुळे बँकेकडून सेवेतील कोणतीही त्रुटी झालेली नसल्याचा निष्कर्ष काढत ग्राहक आयोगाने तक्रार फेटाळली.
बँकेचे म्हणणे काय?
- संबंधित व्यवहार ओटीपी पडताळणीनंतर सुरक्षित पद्धतीने झाला असून, ओटीपी हा गोपनीय असतो आणि तो फक्त कार्डधारकालाच माहीत असतो, असे बँकेने नमूद केले.
- एचडीएफसी बँकेच्या उत्तराने समाधान न झाल्याने तक्रारदाराने ग्राहक आयोगाकडे धाव घेतली आणि बँकेच्या निष्काळजीपणामुळे आपल्या खात्यातून पैसे काढल्याचा दावा केला.
- सेच, बँकेच्या सेवेत त्रुटी असल्याचा आरोपही केला. तक्रारदारानेच फसव्या लिंकवर क्लिक केले आणि त्याच्या सर्व तपशीलांशी जुळणारी माहिती असल्याने ओटीपी तयार झाला. त्यामुळे व्यवहार नाकारण्याचे बँकेकडे कोणतेही कारण नव्हते, असे बँकेने न्यायालयाला सांगितले.