Shankaracharya Swami Avimukteshwaranand Saraswati Maharaj: मराठी असेल किंवा हिंदी असेल, सगळ्या भारताच्याच भाषा आहेत. मराठी किंवा हिंदी भारतातील भाषांवर भारतवासी प्रेम करतो. केवळ बंगालमधील लोक म्हणाले की, आमचेच बंगाली भाषेवर प्रेम आहे. गुजरातचे लोक म्हणाले की, आमचेच गुजराती भाषेवर प्रेम आहे. महाराष्ट्राचे लोक म्हणाले की, आमचेच मराठीवर प्रेम आहे, तर असे म्हणून चालणार नाही. कारण संपूर्ण देशाचे या सगळ्या भाषांवर प्रेम आहे, असे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी स्पष्ट केले.
आम्ही तसेच देशातील सगळेच सण सर्व भाषांचा आदर करतात, प्रेम करतात. आम्हाला मराठी भाषा येत नसली, तरी ती यावी, ती शिकावी, यासाठी आम्ही प्रयत्न करू. महाराष्ट्राला मोठी संत परंपरा आहे. अनेक मोठे संत महाराष्ट्रात होऊन गेले. त्यांनी त्यांची शिकवण, ज्ञान मराठी भाषेतून दिले आहे. वारकरी संप्रदायाचे अभंग असतील, संतवाणी असेल, ज्ञानेश्वरी असेल किंवा संतांचे कोणतेही ग्रंथ असतील, हे सगळे मराठी भाषेत आहेत. संतांनी दिलेले ज्ञान आणि शिकवण आत्मसाद करण्यासाठी मराठी भाषा शिकण्याचा प्रयत्न असेल. आम्ही महाराष्ट्रातील नसलो, तरी आम्हाला मराठीबाबत प्रेम आहे, असे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी नमूद केले.
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल?
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन बंधू तब्बल २० वर्षांनंतर वरळी डोममधील मराठी विजय मेळाव्यात एकत्र आले. आगामी महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी ठाकरे बंधू एकत्र येणार का, याबाबत अद्याप स्पष्टता नाही किंवा तशी घोषणा करण्यात आलेली नाही. ठाकरे बंधू एकत्र येण्याबाबत, मनसे-ठाकरे गटाच्या युतीबाबत शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांना प्रतिक्रिया विचारण्यात आली होती. यावर बोलताना, यासंदर्भात वैयक्तिक भाष्य करणे योग्य वाटत नाही. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचा हा मेळ अमेळ आहे. तो जास्त काळ टिकणार नाही. तसेच त्याचा महाराष्ट्राच्या राजकारणावर कोणताही परिणाम होणार नाही. राज ठाकरे यांची राजकारण करण्याची शैली वेगळी आहे आणि उद्धव ठाकरे यांची राजकारण करण्याची पद्धत वेगळी आहे. त्यामुळे ठाकरे बंधू एकत्र आले तरीही ते किती काळ टिकतील? जास्त काळ टिकू शकत नाही. राज ठाकरे एका समाजाला पुढे घेऊन जातात आणि आपली मते ठामपणे, स्पष्टपणे मांडतात. दुसरीकडे उद्धव ठाकरे समावेशी विचारांचे झाले आहेत, असे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी स्पष्टपणे सांगितले.
दरम्यान, हिंदी भाषेला रोखणे किंवा मराठीला प्रोत्साहन देणे हा त्यांचा मुद्दाच नाही. राजकारणासाठी हे सगळे केले जात आहे. राजकारणासाठी तुम्ही जे काही करत आहात, ते स्पष्टपणे दिसत आहे. मराठी अस्मिता ही वेगळी गोष्ट आहे. तुम्ही हिंदीत का बोलता, कारण संपूर्ण देशाशी तुम्हाला संपर्क, संवाद साधायचा आहे. तुम्ही इंग्रजी भाषेचे समर्थन का करता? हिंदीचा विरोध करत आहात, इंग्रजीचे समर्थन करत आहात, असे का करता तुम्ही? आमच्या मुलांना इंग्रजी यायला हवे, कारण ती जगाची संपर्क भाषा आहे, असे तुम्हाला वाटत असेल, तर हिंदी भाषेतून देशाशी संपर्क, संवाद साधायला तुमचा विरोध का? भारताच्या अनेक राज्यांमध्ये हिंदी बोलली जाते. हिंदी देशाची राष्ट्रभाषा नसली, तरी राजभाषा आहे. सगळ्या राज्यांना आपापल्या भाषांमधून व्यवहार करण्याची मुभा आहे. महाराष्ट्रात विधिमंडळापासून ते शासन, प्रशासनापर्यंत मराठीतून व्यवहार होतो, असे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी म्हटले आहे. ते टीव्ही९शी बोलत होते.