हृदयद्रावक! बॉयफ्रेंडसोबत पळून गेली बायको; ढसाढसा रडत नवऱ्याने ४ मुलांसह नदीत मारली उडी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2025 15:27 IST2025-10-04T15:26:19+5:302025-10-04T15:27:51+5:30
नदीत उडी मारण्यापूर्वी तरुणाने एक व्हिडीओ रेकॉर्ड केला आणि तो त्याच्या बहिणीला पाठवला.

फोटो - आजतक
उत्तर प्रदेशातील शामली जिल्ह्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. कैरानाच्या खैलकला परिसरातील एका व्यक्तीने त्याच्या चार लहान मुलांसह यमुना नदीत उडी मारून आत्महत्या केली. पत्नी बॉयफ्रेंडसोबत पळून गेल्यानंतर त्याने हे टोकाचं पाऊल उचललं. या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. नातेवाईकांना मोठा धक्का बसला आहे.
नदीत उडी मारण्यापूर्वी तरुणाने एक व्हिडीओ रेकॉर्ड केला आणि तो त्याच्या बहिणीला पाठवला. या व्हिडिओमध्ये त्याने ढसाढसा रडत त्याची व्यथा मांडली. हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने व्हिडिओमध्ये म्हटलं आहे की, त्याची पत्नी दोन दिवसांपूर्वी तिच्या बॉयफ्रेंडसोबत पळून गेली, घर सोडून गेली ज्यामुळे तो निराश झाला आहे.
घटनेची माहिती मिळताच कैराना पोलीस स्टेशनचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि यमुना नदीत मुलांचा आणि वडिलांचा शोध घेण्यास सुरुवात केली. नदीकाठावर मोठी गर्दी जमली होती, पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणाला चार मुलं होती. पत्नी पळून गेल्यानंतर त्याने टोकाचं पाऊल उचलले. शामलीच्या एसपींनी सांगितलं की, मृतदेहांचा शोध घेत आहेत आणि कुटुंबातील सदस्यांची चौकशी केली जात आहे.
तरुणाच्या बहिणीने पोलिसांना भावाने तिला पाठवलेला आणि सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडीओ देखील दाखवला, ज्यामध्ये तरुणाने त्याची व्यथा मांडली. तो खूप रडत होता. पत्नी मुलांना सोडून बॉयफ्रेंडसोबत पळून गेल्यामुळे भावाचं मानसिक संतुलन पूर्णपणे बिघडलं होतं अशी माहिती देखील बहिणाने पोलिसांना दिली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.