दिल्ली पोटनिवडणुकीत भाजपाला धक्का, काँग्रेसने खाते उघडले; आम आदमी पक्षाचे काय झाले?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2025 20:17 IST2025-12-03T20:16:10+5:302025-12-03T20:17:07+5:30
MCD Bypoll Election 2025 Result: दिल्लीत १२ जागांवर झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेसने खाते उघडले. भाजपाला दोन जागा गमवाव्या लागल्या.

दिल्ली पोटनिवडणुकीत भाजपाला धक्का, काँग्रेसने खाते उघडले; आम आदमी पक्षाचे काय झाले?
MCD Bypoll Election 2025 Result: देशभरातील अनेक ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. दिल्ली नगर निगमच्या झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपाला धक्का बसला आहे. काँग्रेसने या निवडणुकीत खाते उघडले. तर विधानसभा निवडणुकीत झालेल्या मोठ्या पराभवानंतर आम आदमी पक्षाने कमबॅक केल्याचे पाहायला मिळाले.
दिल्ली महानगरपालिकेच्या १२ वॉर्डांमध्ये झालेल्या पोटनिवडणुकांचे निकाल जाहीर झाले. १२ जागांपैकी भाजपाने सर्वाधिक सात जागा जिंकल्या, तर आम आदमी पक्षाने तीन जागा जिंकल्या, तर काँग्रेसने एक जागा जिंकली. एका जागेवर अपक्ष उमेदवार निवडून आला. या पोटनिवडणुकीत भाजपाने संगम विहार आणि मुंडका या जागा गमावल्या. भाजपा आमदार चंदन चौधरी यांनी महापालिकेतील सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर संगम विहारची जागा रिक्त झाली. परंतु, त्यांच्या प्रतिमेमुळे भाजपा उमेदवाराकडे लोकांनी पाठ फिरवली आणि काँग्रेसला ही जागा जिंकण्यात यश आले.
भाजपाचे कहीं खुशी, कहीं गम
दुसरीकडे, मुंडका येथे स्थानिक भाजपा आमदार गजेंद्र दराल यांच्याबाबत असंतोष असल्याने या ठिकाणी आम आदमी पक्षाच्या उमेदवाराने बाजी मारली. परंतु, आम आदमी पक्षााच्या ताब्यात असलेली चांदणी चौक जागा भाजपा उमेदवार सुमन गुप्ता यांना १,१८२ मतांनी जिंकली. ही भाजपासाठी दिलासादायक बाब मानली जात आहे. २०२२ च्या निवडणुकीत सर्वाधिक फरकाने जिंकलेली चांदणी महल जागा यावेळी आम आदमी पक्षाने गमावली. 'आप'चे उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर राहिले. 'आप'चे बंडखोर आमदारांच्या पाठिंब्याने मोहम्मद इम्रान यांनी ४,५९२ मतांनी ही जागा जिंकली. संगम विहारमध्येही 'आप' तिसऱ्या क्रमांकावर राहिले.
दरम्यान, दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आप संयोजक अरविंद केजरीवाल यांनी पोटनिवडणुकांच्या निकालांबाबत आनंद व्यक्त केला. यावेळी आम आदमी पक्षाने महापालिका पोटनिवडणुकीत आपले समर्पित कार्यकर्ते उभे केले. दिल्लीतील जनतेने त्यांच्या जनादेशाद्वारे हे स्पष्ट केले आहे की 'आप'ला जनतेचा पाठिंबा सातत्याने वाढत आहे, असे अरविंद केजरीवाल म्हणाले.