एकटी पाहून घरात घुसला, बळजबरी करू लागला, तरुणीने कुऱ्हाड उचलली आणि...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2026 15:41 IST2026-01-02T15:40:08+5:302026-01-02T15:41:03+5:30
Uttar Pradesh Crime News: मद्यधुंद अवस्थेत घरात घुसून बळजबरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका ५० वर्षीय इसमाची १९ वर्षीय तरुणीने क्रूरपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेशमधील बांदा येथील मुरवल गावात घडली.

एकटी पाहून घरात घुसला, बळजबरी करू लागला, तरुणीने कुऱ्हाड उचलली आणि...
मद्यधुंद अवस्थेत घरात घुसून बळजबरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका ५० वर्षीय इसमाची १९ वर्षीय तरुणीने क्रूरपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेशमधील बांदा येथील मुरवल गावात घडली. सदर तरुणी घरात एकटीच असताना शेजारीत एक इसम घरात घुसला. मद्यधुंदावस्थेत असलेला हा इसम तिच्यावर बळजबरी करू लागला. मात्र या तरुणीन प्रतिकार करत बाजूला ठेवलेल्या धारदार हत्याराने हल्ला करत या इसमाला गंभीर जखमी केले. यात त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, या तरुणीला अटक करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार हा इसम या तरुणीला घरात एकटी असल्याचं पाहून घरात घुसला. त्याने मद्यधुंद अवस्थेत तरुणीसोबत गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केला. मात्र या तरुणीने विरोध केल्यावर त्याने बळजबरी करण्यास सुरुवात केली. तेव्हा संतापलेल्या तरुणीने बचावासाठी बाजूला ठेवलेल्या कुऱ्हाडीने या इसमावर वार केले. हे वार वर्मी लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवला. तसेच पोलिसांनी आरोपी तरुणीला ताब्यात घेत तिच्यावर अटकेची कारवाई केली आहे. ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार ‘या तरुणीच्या वडिलांचं आधीच निधन झालेलं आहे. हल्ल्यात मृत्यू झालेल्या इसमाचे या तरुणीच्या आईसोबत संबंध होते. त्यामुळे त्याचं घरी येणं जाणं होतं. ही बाब या तरुणीला फारशी आवडत नव्हती. तसेच आज या इसमाने तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केल्याने तिने हे टोकाचं पाऊल उचललं’. दरम्यान, या तरुणीने स्वत:ला वाचवण्यासाठी जे काही केलं ते योग्य केलं, असं ग्रामस्थ म्हणत आहेत. मात्र मृत इसमाच्या नातेवाईकांनी आरोपी तरुणीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.