बिहार निवडणुकीपूर्वी NDA मध्ये रस्सीखेच; स्वत:ला मोदींचा हनुमान म्हणवणारा नेता का आहे नाराज?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2025 08:43 IST2025-10-09T08:41:01+5:302025-10-09T08:43:17+5:30
एनडीएमधील जागावाटपावर आज अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे. भाजपासह घटक पक्षातील वरिष्ठ नेत्यांशी सतत चर्चा सुरू आहे.

बिहार निवडणुकीपूर्वी NDA मध्ये रस्सीखेच; स्वत:ला मोदींचा हनुमान म्हणवणारा नेता का आहे नाराज?
पटना - बिहार विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली आहे. उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला आता काही तास शिल्लक आहेत, परंतु आतापर्यंत महाआघाडी आणि एनडीए युतीमध्ये जागावाटपावर एकमत नाही. विरोधी पक्षांच्या महाआघाडीत सर्व काही ठीक आहे आज त्यावर शिक्कामोर्तब होईल असं बोलले जाते परंतु एनडीएमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे. त्यामागचं कारण म्हणजे स्वत:ला नरेंद्र मोदींचा हनुमान म्हणवणाऱ्या चिराग पासवान नाराज असल्याची चर्चा आहे. चिराग पासवान यांनी जितक्या जागांची मागणी केली आहे तितक्या युतीत मिळणे कठीण आहे. मात्र पासवान यांची नाराजी जागांवरून नाही तर त्यामागे अन्य कारण असल्याचं बोलले जाते.
काही जण ३६ जागा बोलत आहे तर काहींनी ४० जागांची मागणी केली आहे. जास्तीच्या जागांसाठी चिराग पासवान आग्रही आहेत. परंतु चिराग पासवान ३ जागांसाठी अडून बसले आहेत. युतीत त्यांना २५ ते २६ जागा सोडण्याची तयारी घटक पक्षांनी दाखवली आहे परंतु चिराग पासवान यांना ज्या ३ जागा हव्या आहेत त्यासाठी ओढाताण सुरू आहे. या ३ जागांमध्ये मटिहानी विधानसभा मतदारसंघ, सिंकदरा आणि गोविंदगंज विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. हे तिन्ही मतदारसंघ चिराग पासवान यांना हवे आहेत. यातील मटिहानी मतदारसंघात २०२० मध्ये लोक जनशक्तीचा उमेदवार जिंकला होता. परंतु तिथले विद्यमान आमदार राजकुमार सिंह जेडीयूत गेलेत. गोविंदगंज येथे आधीच जेडीयूचा आमदार आहे तर सिकंदरा मतदारसंघात जीतन राम मांझी यांच्या हम पार्टीचा कब्जा आहे. कुठल्याही परिस्थितीत हे ३ मतदारसंघ मिळावेत यासाठी चिराग पासवान हट्ट धरून बसलेत.
तर नाव न सांगण्याच्या अटीवर चिराग पासवान यांचे निकटवर्तीय असलेल्या एका नेत्याने सांगितले की, आमच्या पक्षाने ३५ किंवा ४० जागांची मागणी केली आहे असे काहीही नाही. २६ जागांची यादी सादर करण्यात आली आहे, परंतु तीन जागांवर अजूनही वाटाघाटी सुरू आहेत. पहिली आणि सर्वात महत्त्वाची मागणी म्हणजे मटिहानी विधानसभा जागा, जी २०२० मध्ये आमच्या पक्षाकडून राजकुमार सिंह यांनी जिंकली होती, परंतु ते २०१९ मध्ये जेडीयूमध्ये सामील झाले. त्या जागेची मागणी केली जात आहे, परंतु जेडीयू ती देण्यास तयार नाही असं त्यांनी म्हटलं.
सिकंदरा आणि गोविंदगंज जागांचीही मागणी
दुसरी जागा म्हणजे सिकंदरा विधानसभा जागा, जी जीतन राम मांझी यांच्या उमेदवाराने जिंकली. ती जागा मागितली जात आहे आणि तिसरी गोविंदगंज विधानसभा जागा आहे, जिथे जेडीयूचा एक आमदार आहे. आमच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष राजू तिवारी यांनी याआधी ही जागा जिंकली होती. ते आमच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत, त्यांचा सन्मान ठेवला पाहिजे त्यामुळे आम्हाला ती जागा हवी आहे असं त्यांनी सांगितले. जेडीयू गोविंदगंज जागेवर जास्त दबाव आणत नाही, परंतु ते मटिहानी जागा सोडण्यास तयार नाहीत आणि आम्ही त्यावर तडजोड करण्यास तयार नाही. कारण आम्ही ती जागा आधीच जिंकली आहे, आम्हाला ती हवी आहे. आम्ही कोणत्याही परिस्थितीत सिकंदरा जागा देखील घेऊ. मंगळवारी धर्मेंद्र प्रधान, मंगल पांडे आणि विनोद तावडे यांनी आमचे नेते चिराग यांची दिल्लीत भेट घेतली असं त्या नेत्याने माहिती दिली.
जागांव्यतिरिक्त चिराग पासवान यांच्या तीन मागण्या काय?
जागांव्यतिरिक्त चिराग पासवान यांनी तीन मागण्या केल्या आहेत. एक राज्यसभेची जागा, एक एमएलसीची जागा आणि एखाद्या आयोगाचं अध्यक्षपद..परंतु आम्हाला अद्याप भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून हिरवा कंदील मिळालेला नाही त्यामुळे पेच असल्याचं लोजपाचे नेते सांगतात. सध्या चिराग पासवान स्वतंत्रपणे निवडणूक लढवू शकतात अशी चर्चा आहे, पण तसं होणार नाही. आम्ही युतीचा घटक म्हणून निवडणूक लढवू आणि फक्त २५ ते २६ जागा लढवू. आम्ही त्यापेक्षा जास्त जागा मागत नाही. पण आम्हाला मागितलेल्या जागा हव्या आहेत असं पासवान गटातील नेत्यांनी म्हटलं.
NDA मध्ये जागावाटप कसं होणार?
एनडीएमधील जागावाटपावर आज अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे. भाजपासह घटक पक्षातील वरिष्ठ नेत्यांशी सतत चर्चा सुरू आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जेडीयूला १०२ जागा, भाजपाला १०१, उपेंद्र कुशवाहा ६ ते ७ जागा आणि जीतन राम मांझी यांच्या पक्षाला ७ ते ८ जागा मिळतील. एलजेपीसाठी २५ ते २६ जागांसाठी वाटाघाटी सुरू आहेत आणि हे जवळजवळ अंतिम झालं आहे.