वाचवायचं की संपवायचं? अरावली संकटामुळे धोक्यात आलेली जल शाश्वती आणि मानवी जीवन
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2026 10:42 IST2026-01-04T10:40:26+5:302026-01-04T10:42:10+5:30
अरावली पर्वतरांगांच्या प्रदेशातील ‘पर्वत’ ह्या शब्दाची व्याख्या करताना धोक्यात येणारी जलसुरक्षा या संकटांचा विचार केला गेलेला नाही. या व्याख्येलाच विरोध होत आहे. सर्वोच्च न्यायालय आणि केंद्र सरकार अरावली पर्वतरांगांच्या बाबतीत आपल्या निर्णयाबद्दल पुनर्विचार करेल अशी आशा आपण बाळगूया.

वाचवायचं की संपवायचं? अरावली संकटामुळे धोक्यात आलेली जल शाश्वती आणि मानवी जीवन
अविनाश कुबल, पर्यावरण तज्ज्ञ
ज्याचे अस्तित्व २०० कोटी वर्षांहून अधिक काळासाठी पृथ्वीतलावर आहे अशा अरावली पर्वतरांगांच्या नैसर्गिकरित्या निर्माण झालेल्या रचनेची व्याख्या पुनर्रचित करून त्यामार्गे या पर्वतरांगांमधल्या १०० मीटरहून कमी उंचीच्या असलेल्या टेकड्यांना आणि पर्वतरांगांच्या तळाकडील भागांना अरावली पर्वताच्या रचनेच्या व्याख्येतून वगळण्याचा केंद्र शासनाचा निर्णय अत्यंत दुर्दैवी असाच म्हणावा लागेल.
प्रत्यक्षात, ज्या राज्याचा या पर्वतरांगांच्या अस्तित्वासही फारच कमी संबंध येतो अशा हरियाणा राज्याने केंद्र शासनाच्या वन, पर्यावरण तथा हवामान बदल मंत्रालयाकडे ही व्याख्या पुनर्रचित करण्याची मागणी करून त्याद्वारे मधाच्या पोळ्यावर दगड मारण्याचे काम केले. केंद्र शासनाच्या वन, पर्यावरण तथा हवामान बदल मंत्रालयाने हा विषय देशाच्या सर्वोच्च न्यायालयात नेऊन त्यावर राजकीय परिस्थितीला अनुकूल अशी व्याख्या अधोरेखित करून घेतली आणि त्यामुळे या वादाला सुरुवात झाली.
बनास, लूणी, साबरमती, साहिबी, अरवारी, बेराच, सखी आणि चंबल अशा नद्यांचा उगम या अरावली पर्वतरांगांच्या प्रदेशातून होतो. या नद्यांचे उगमस्थान असलेल्या अरावली पर्वताचेच अस्तित्व आता ह्या नवीन व्याख्येमुळे धोक्यात आले असून पर्वतरांगांच्या १०० मीटर पर्यंत उंचीच्या अर्थात तळाच्या भागात मोठ्या प्रमाणात खाणकाम, बांधकाम, नागरीकरण अशा गोष्टी सुरू होतील अशी भीती व्यक्त होत आहे. परंतु या सोबतच अरावली पर्वतरांगांच्या परदेशातून उगम पावलेल्या या सर्व नद्यांचे अस्तित्व सुद्धा धोक्यात येणार अशी भीती व्यक्त होत आहे.
परिणामी या नद्यांच्या आश्रयाने वाढलेली शहरे गावे तसेच उद्योगधंदे प्रामुख्याने शेती आणि पशुपालन मोठ्या
प्रमाणावर धोक्यात येणार आहे. कारण पर्वतीय प्रदेशातून उगम पावल्यामुळे, त्या अर्थाने पर्वतपुत्री म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नद्यांचा मुख्य आधार पर्वतीय प्रदेश आणि त्यावर असलेली जंगले हाच असतो.
अशी आहे ही पर्वतरांग
अरावली पर्वतरांगांचे स्थान उत्तरेकडे चंडीगड पंजाब पासून सुरू होऊन दक्षिणेकडे गुजरातपर्यंत या पर्वतरांगांचे अस्तित्व दिसून येते. भौगोलिकदृष्ट्या पाहता या पर्वतरांगांच्या पश्चिमेकडील भागामध्ये जगातील १७व्या क्रमांकाचे मोठे असलेले थार वाळवंट पसरलेले आहे. त्यांच्या पूर्वेकडील भागामध्ये गंगा आणि यमुना ह्या दोन अति विशाल नद्यांच्या खोऱ्याच्या गाळाच्या अत्यंत सुपीक जमिनीचा प्रदेश ज्याला स्थानिक भाषेत दोआबा म्हटले जाते असा भाग येतो. सध्या हा संपूर्ण प्रदेश कमी पावसाचा प्रदेश झाला आहे.
४०० ते ८०० मिलिमीटर इतकाच वार्षिक पाऊस येथे दक्षिण पश्चिम मान्सूनच्या काळात म्हणजे जुलै ते सप्टेंबर दरम्यान सर्वसाधारणपणे पडतो. अरावली पर्वतरांगांच्या पश्चिमेकडील उताराच्या भागात पूर्वेकडील उताराच्या तुलनेत पावसाचे प्रमाण कमी असल्याचे आढळते. तसेच पूर्वेकडील उताराच्या तुलनेत पश्चिमेकडील उताराच्या भागात वनआच्छादन जास्त शुष्क, तुरळक आणि कमी प्रतीचे असल्याचे देखील दिसून येते.
पश्चिमेकडील वाळवंटी प्रदेशातून पूर्वेकडे सतत वाहणाऱ्या उष्ण आणि शुष्क वाऱ्यांचा परिणामी, अरावली पर्वतरांगांच्या पश्चिमेकडील उताराच्या भागातील वनआच्छादन पूर्वेकडील उताराच्या तुलनेत निम्न प्रतीचे झाले असावे असा अंदाज बांधायला हरकत नाही. या वनआच्छादनेच्या सुदृढतेचा परिणाम त्या त्या खोऱ्यातून वाहणाऱ्या जलप्रवाह अर्थात नद्यांच्या सुदृढतेवर स्पष्टपणे दिसून येतो.
ज्या खोऱ्यातील वने जास्त सुदृढ, त्या खोऱ्यातील नद्यांमध्ये पाण्याची प्रवाहिता मोठी आणि वर्षातील जास्त काळासाठी. आणि अर्थातच याच्या अगदी उलट परिस्थिती वने कमी सुदृढ असलेल्या खोऱ्यातील नद्यांची. अशा खोऱ्यातील नद्यांमध्ये पाण्याची प्रवाहिता कमी आणि ती सुद्धा बहुधा केवळ पावसाळ्याच्या अत्यंत थोड्या काळासाठी. हे सगळं वाचवायचं की संपवायचं? हाच खरा प्रश्न आहे.
हिरवी भिंत पडत जाणार?
पश्चिमेकडे असलेल्या थार वाळवंटाचे पूर्वेकडे होत असलेले स्थलांतर रोखण्यासाठी या प्रदेशातली हिरवळ टिकवून ठेवणे अत्यंत गरजेचे आहे.
त्यादृष्टीने या प्रदेशात मोठ्या प्रमाणावर सुरू असलेले अरावली हरित पट्ट्याचे कार्य सुद्धा बंद पडेल आणि त्या अर्थाने या संपूर्ण प्रदेशाचे वाळवंटीकरण फार झपाट्याने होईल.
पाण्याची शाश्वती संपुष्टात आली तर या सर्व गोष्टींवर त्याचा फार मोठा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे ही हिरवी भिंत टिकवणे गरजेचे आहे.
...तर मानवाचेही अस्तित्व धोक्यात
हिमालय, पश्चिम घाट, पूर्व घाट, विंध्याचल या सर्व डोंगररांगांमधून उद्गमित होणाऱ्या नद्या शेती आणि शेतीशी निगडित व्यवसाय व उद्योगांचे अस्तित्व टिकवून ठेवतात. तसेच तेथील जमिनींचे सुजलाम सुफलाम स्वरूपात भरण पोषण करतात.
अति प्राचीन पर्वतरांगांकडे खाणीसाठी सुयोग्य परिसर म्हणून पाहिले गेले तर त्या परिसरातील पावसाचे पाणी पावसाळ्यातच वाहून जाईल. पाण्याची पातळी खालावल्याने जलशून्य परिसर निर्माण होईल. त्यामुळे मानवासोबतच इतर सर्व प्राणी, वनस्पतींचे अस्तित्व, शेतीही धोक्यात येईल.