स्मार्टफोनमध्ये संचार साथी ॲप अनिवार्य नाही; सर्व बाजूंनी टीका झाल्यानंतर सरकारची माघार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2025 10:38 IST2025-12-04T10:36:24+5:302025-12-04T10:38:41+5:30
मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, सरकारने मोबाइल उत्पादकांना ॲप प्री-इन्स्टॉल करणे अनिवार्य करण्याचा निर्णय मागे घेतला आहे.

स्मार्टफोनमध्ये संचार साथी ॲप अनिवार्य नाही; सर्व बाजूंनी टीका झाल्यानंतर सरकारची माघार
नवी दिल्ली : स्मार्टफोन उत्पादकांना सर्व नवीन मोबाइल फोनमध्ये संचार साथी हे सायबरसुरक्षा ॲप प्री-इन्स्टॉल करणे अनिवार्य केलेला निर्देश सरकारने बुधवारी मागे घेतला. वापरकर्त्यांच्या गोपनीयतेचे उल्लंघन होऊ शकते आणि पाळत ठेवण्याचा धोका निर्माण होऊ शकतो, अशी चोहोबाजूंनी टीका झाल्यानंतर हे पाऊल उचलण्यात आले.
तथापि, संचार साथी ॲप फक्त चोरीला गेलेले फोन शोधण्यास, ब्लॉक करण्यास आणि गैरवापर रोखण्यास मदत करते. ते ॲप स्टोअरवर स्वेच्छेने डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध राहील, असे सरकारचे म्हणणे आहे.
मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, सरकारने मोबाइल उत्पादकांना ॲप प्री-इन्स्टॉल करणे अनिवार्य करण्याचा निर्णय मागे घेतला आहे.
ॲप कॉल ऐकू शकते आणि संदेश वाचू शकते, असा विरोधी पक्ष आणि खासगीत्त्वाचे समर्थन करणाऱ्यांनी दावा केल्यानंतर हे पाऊल उचलले आहे. ॲपल आणि सॅमसंगसारख्या काही उत्पादकांनी २८ नोव्हेंबरच्या आदेशावर आक्षेप घेतल्याचे वृत्त आहे.
एका दिवसात सहा लाख जणांनी डाउनलोड केले ॲप
मंत्रालयाच्या निवेदनानुसार, वापरकर्त्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. एकाच दिवसात ६,००,००० नागरिकांनी ॲप डाउनलोड करण्यासाठी नोंदणी केली आहे. ही त्याच्या वापराच्या १० पट वाढ आहे. जागतिक स्तरावर, सर्व स्मार्टफोनवर सायबरसुरक्षा ॲप्स प्री-इन्स्टॉलेशन अनिवार्य करणारा आदेश कोणत्याही देशाने काढलेला नाही. एकमेव अपवाद रशिया आहे, ज्याने ऑगस्टमध्ये सरकारी ॲप अनिवार्य केले.
‘हेरगिरी करणे शक्य नाही’
दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी सूचित केले होते की, सरकार २८ नोव्हेंबरच्या आदेशात सुधारणा करण्यास तयार आहे. तथापि, त्यांनी सांगितले होते की, ॲपद्वारे हेरगिरी करणे शक्य नाही आणि होणारही नाही.
त्यांनी लोकसभेत काँग्रेस नेते दीपेंदर सिंग हुडा यांनी ॲपशी संबंधित हेरगिरीच्या चिंतेबाबत विचारलेल्या पुरवणी प्रश्नाच्या उत्तरात ही माहिती दिली होती.
वापरकर्ते ॲप हटवू शकतात. जेव्हा वापरकर्ता त्यावर नोंदणी करतो तेव्हाच ते सक्रिय होते. एखादा वापरकर्ता ॲपवर नोंदणीकृत नसेल तर ॲप सक्रिय होणार नाही आणि कोणीही ते हटवू शकते, असेही ते म्हणाले होते.
दीड कोटी जणांनी डाऊनलोड केले
आतापर्यंत अंदाजे १.५ कोटी जणांनी ॲप डाऊनलोड केले आहे.
पोर्टल आणि ॲपच्या मदतीने २६ लाख चोरीचे हँडसेट शोधण्यात आले आहेत.
चोरीचे ७००,००० हँडसेट ग्राहकांना परत करण्यात आले आहेत.
४१ लाख मोबाइल कनेक्शन डिस्कनेक्ट करण्यात आले आहेत आणि ६,००,००० जणांची फसवणूक रोखण्यात
आली आहे.