Sachin Pilot meets Amit Shah; Whip issued to Congress MLAs | Rajasthan Political Crisis : राजस्थानच्या राजकारणासाठी आजचा दिवस महत्वाचा; काँग्रेसच्या आमदारांना व्हिप जारी

Rajasthan Political Crisis : राजस्थानच्या राजकारणासाठी आजचा दिवस महत्वाचा; काँग्रेसच्या आमदारांना व्हिप जारी

जयपूर : काँग्रेसचे नेते व राजस्थानचे उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्याविरुद्ध बंड पुकारल्याचे स्पष्ट झाले असून, ते आता भाजपा नेत्यांच्या संपर्कात आहेत. त्यामुळे ते 30 आमदारांसह भाजपामध्ये जातील, अशी चर्चा सुरू झाली आहे. तसेच, सचिन पायलट यांनी रात्री उशिरा केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपाचे नेते अमित शहा यांची भेट घेतल्याचे सुत्रांकडून समजते. या भेटीत काय चर्चा झाली, याबाबत अद्याप अधिकृतरित्या माहिती मिळू शकली नाही.

दरम्यान, रविवारच्या राजकीय घडामोडीनंतर काँग्रेसने सोमवारी सकाळी सर्व आमदारांची बैठक बोलावली आहे. तसेच, या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी काँग्रेसने रात्री उशिरा आपल्या सर्व आमदारांना व्हिप जारी केला आहे. राजस्थानमधील काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अविनाश पांडे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी अविनाश पांडे म्हणाले की, राजस्थान सरकार पूर्णपणे सुरक्षित आहे. 109 आमदारांनी पाठिंब्याचे पत्र सादर केले आहे. तसेच, सर्व आमदारांना व्हिप जारी केला असून जर एखादा आमदार या बैठकीला उपस्थित राहिला नाही तर पक्षाकडून त्यांच्याविरूद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असे अविनाश पांडे यांनी सांगितले. यावेळी अविनाश पांडे यांच्यासमवेत रणदीप सुरजेवाला देखील उपस्थित होते. 

सचिन पायलट यांनी रविवारी दिल्लीत काँग्रेसचे नेते अहमद पटेल यांची भेट घेतली खरी, पण त्यानंतर ते अलीकडेच भाजपामध्ये सहभागी झालेल्या ज्योतिरादित्य सिंदिया यांचीही भेट घेतली. ज्योतिरादित्य सिंदिया यांनी सचिन पायलट यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर एक ट्वीट केले. 'मित्राच्या सध्याच्या स्थितीवर दया येते, मुख्यमंत्री गेहलोत सचिन पायलट यांची कोंडी करण्याचा प्रयत्न करत आहेत. काँग्रेसमध्ये कर्तृत्व आणि क्षमता यांना प्राधान्य दिले जात नाही' अशा स्वरुपाचे हे ट्वीटआहे.

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या विरोधात सचिन पायलट एक पर्याय म्हणून भाजपशी चर्चा करत आहेत. भाजपाने बाहेरुन पाठिंबा देण्याची तयारी दाखवली तर निवडक आमदारांना सोबत घेऊन स्वतंत्र गट स्थापन करण्याची तयारी सचिन पायलट करत आहेत. भाजपाच्या पाठिंब्यावर सचिन पायलट मुख्यमंत्री होण्यास उत्सुक आहेत, अशी चर्चा सध्या सुरु आहे. तसेच, एएनआय या वृत्तसंस्थेने काँग्रेसचे किमान 30 आमदार आणि निवडक अपक्ष आमदार  सचिन पायलट यांचे समर्थन करत असल्याचे वृत्त दिले आहे.

काँग्रेस बंड मोडून काढणार
काँग्रेस व गेहलोत यांनीही पायलट यांच्या बंड मोडून काढायचे आणि पायलट यांना एकटे पाडायचे, ठरविले असावे, असे दिसते. त्यामुळेच राजस्थानात गेहलोत हेच मुख्यमंत्री राहतील, असे काँग्रेसने स्पष्ट केले आहे. सरकार पाडण्याचे प्रयत्न भाजप करीत असून प्रत्येक आमदाराला १५ कोटी रुपयांची लालूच दाखवली जात असल्याचा आरोप काँग्रेसने शनिवारीच केला होता.
त्यानंतर भाजपच्या दोन कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला. तसेच गेहलोत आणि पायलट यांना त्यांचे म्हणणे नोंदविण्यास पोलिसांनी सांगितले. त्यामुळे पायलट अधिकच संतापले आहेत.

तीन अपक्ष आमदारांवर नोंदवले गुन्हे
- अपक्ष आमदार फोडून राजस्थानमधील काँग्रेसचे अशोक गेहलोत सरकार पाडण्याच्या कथित ‘कारस्थाना’वरून राज्यातील राजकीय वातावरण तापलेले असतानाच राज्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) याच संदर्भात सरकारला पाठिंबा देणा-या तीन अपक्ष आमदारांविरुद्ध गुन्हे नोंदविले.
- ओम प्रकाश हुडला, सुरेश टांक व खुशवीर सिंग या तीन अपक्ष आमदारांविरुद्ध ही कारवाई करण्यात आली आहे, यास ह्यएसीबीह्णचे महासंचालक डॉ. आलोक त्रिपाठी यांनी दुजोरा दिला. हा गुन्हा नोंदविला जाताच काँग्रेसने या तिघांचे काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे सहयोगी सदस्यत्वही रद्द केले.
- सरकार पाडण्यासाठी बांसवाडा आणि डुंगरपूरमधील अपक्ष आमदारांसह इतरही काही आमदारांना कोट्यवधी रुपयांची लांच देऊ केल्याच्या आरोपांवरून हे गुन्हे नोंदविण्यात आल्याचे समजते. लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार लाच देणे हाही गुन्हा आहे.
 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Sachin Pilot meets Amit Shah; Whip issued to Congress MLAs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.