सबरीमाला मंदिरातील सोन्याच्या चोरी प्रकरणी मुख्य पुजारी ताब्यात, एसआयटीची कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2026 15:39 IST2026-01-09T15:36:35+5:302026-01-09T15:39:19+5:30
Sabarimala Mandir Gold Theft Case: केरळमधील प्रसिद्ध मंदिर असलेल्या सबरीमाला मंदिरातील सोन्याच्या चोरी प्रकरणी आज एसआयटीने मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणाचा तपास करत असलेल्या एसआयटीने मंदिर परिसरातील सोन्याचे दागिने गायब झाल्याप्रकरणी मंदिराचे मुख्य पुजारी कंडारारू राजीवारू यांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे.

सबरीमाला मंदिरातील सोन्याच्या चोरी प्रकरणी मुख्य पुजारी ताब्यात, एसआयटीची कारवाई
केरळमधील प्रसिद्ध मंदिर असलेल्या सबरीमाला मंदिरातील सोन्याच्या चोरी प्रकरणी आज एसआयटीने मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणाचा तपास करत असलेल्या एसआयटीने मंदिर परिसरातील सोन्याचे दागिने गायब झाल्याप्रकरणी मंदिराचे मुख्य पुजारी कंडारारू राजीवारू यांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. सबरीमाला मंदिरातील सोन्याची चोरी झाल्याचं प्रकरण उघडकीस आल्यानंतर खळबळ उडाली होती. तसेच घटनेचं गांभीर्य विचारात घेऊन सरकारने चोरीचा तपास करण्यासाठी एसआयटीची स्थापना केली होती.
या प्रकरणी एसआयटीने केलेल्या तपासामध्ये चोरीच्या घटनेमध्ये मंदिरातील अंतर्गत व्यक्तींचा संबंध असू शकतो, अशी माहिती समोर आली होती. त्यामुळे मंदिरातील मुख्य पुजारी असलेल्या कंडारारू राजीवारू यांना या प्रकरणी चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं आहे. कंडारारू राजीवारू हे मंदिरातील वरिष्ठ धार्मिक अधिकारी असून, पूजेचं साहित्य आणि दागिन्यांपर्यंत त्यांचा थेट संबंध येतो. या चोरीच्या प्रकरणात त्यांची मुख्य भूमिका असू शकते, असा एसआयटीला संशय आहे. त्यामुळेच त्यांच्याकडे अधिकची चौकशी केली जात आहे.
दरम्यान, सबरीमाला मंदिरातील चोरी प्रकरणी मुख्य पुजाऱ्यांनाच ताब्यात घेण्यात आल्याने हे संपूर्ण प्रकरण संवेदनशील बनलं आहे. याशिवाय मंदिरातील इतर कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचीही चौकशी सुरू आहे. सबरीमाला मंदिर हे धार्मिक श्रद्धेचं मोठं केंद्र असल्याने हे प्रकरण राजकीय दृष्ट्याही कमालीच संवेदनशील बनलं आहे.