रशियात शिकायला गेला आणि सैन्यात भरती झाला, अखेर युक्रेनी सैन्यासमोर सरेंडर, गुजराती तरुणासोबत काय घडलं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2025 17:33 IST2025-10-08T17:33:11+5:302025-10-08T17:33:49+5:30
Russia Ukrain War: रशियन सैन्याकडून लढणाऱ्या साहिल मोहम्मद हुसेन या गुजराती तरुणाने सरेंडर केल्याची माहिती युक्रेनी सैन्याच्या ६३ व्या मेकॅनाइज बटालियनने दिली आहे. आता या माहितीची पडताळणी सुरू असून, आपल्याकडे युक्रेनच्या अधिकाऱ्यांकडून कुठलीही अधिकृत माहिती आलेली नाही, असे भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने सांगिकले आहे.

रशियात शिकायला गेला आणि सैन्यात भरती झाला, अखेर युक्रेनी सैन्यासमोर सरेंडर, गुजराती तरुणासोबत काय घडलं?
रशिया आणि युक्रेनमध्ये गेल्या साडे तीन वर्षांपासून भीषण युद्ध सुरू आहे. हजारो सैनिक आणि नागरिकांचा बळी गेल्यानंतर आणि मोठ्या प्रमाणावर वित्तहानी झाल्यानंतरही हे युद्ध थांबण्याची चिन्हे दिसत नाही आहे. दरम्यान, या युद्धामध्ये रशियन सैन्याकडून काही भारतीय तरुणही लढत असल्याच्या बातम्या अधूनमधून येत असतात. दरम्यान, रशियन सैन्याकडून लढणाऱ्या साहिल मोहम्मद हुसेन या गुजराती तरुणाने सरेंडर केल्याची माहिती युक्रेनी सैन्याच्या ६३ व्या मेकॅनाइज बटालियनने दिली आहे. आता या माहितीची पडताळणी सुरू असून, आपल्याकडे युक्रेनच्या अधिकाऱ्यांकडून कुठलीही अधिकृत माहिती आलेली नाही, असे भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने सांगिकले आहे.
गुजराती तरुण असलेल्या साहिल मोहम्मद हुसेन याने युक्रेनी सैन्याच्या ज्या ६३ व्या मेकॅनाइज्ड ब्रिगेडसमोर आत्मसमर्पण केले. त्या ब्रिगेडने टेलिग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. १ मिनिट ४५ सेकंदांच्या या व्हिडीओमध्ये हुसेन हा लाल रंगाच्या टी-शर्टमध्ये दिसत आहे. तसेच तो रशियन भाषेत बोलत आहे.
युक्रेनी सैन्याच्या तावडीत सापडलेला साहिल मोहम्मद हुसेन हा मुळचा गुजरातमधील मोरबी येथील रहिवासी आहे. २२ वर्षांचा हुसेन हा शिक्षणासाठी रशियात गेला होता. तसेच त्याने रशियातील एका विद्यापीठामध्ये प्रवेशही मिळवला होता. मात्र तिथे तो एका ड्रग्सच्या केसमध्ये अडकला. त्यामध्ये दोषी आढळल्याने कोर्टाने त्यााल ७ वर्षांची शिक्षा सुनावली. मात्र तुरुंगवास टाळण्यासाठी त्याने वेगळा मार्ग निवडण्याचा निर्णय घेतला.
त्या दरम्यान, रशियन सैन्य शिक्षेच्या बदल्यात युद्धात सेवा देणाऱ्या लोकांचा शोध घेत होतं. साहिल मोहम्मद हुसेन यानेही शिक्षा टाळण्यासाठी रशियन सैन्याकडून लढण्याचा निर्णय घेतला. त्याने रशियन लष्करासोबत मोहिमेवर जाण्यासाठी एका करारावर सह्या केल्या. त्यानंतर त्याची तुरुंगातूनही सुटका झाली.
त्यानंतर आलेल्या अनुभवाबाबत साहिल मोहम्मद हुसेन याने सांगितले की, झालेल्या करारानुसार मला रशियन सैन्याकडून एक वर्ष लढायचे होते. करार संपल्यानंतर मला भारतात परत पाठवलं जाईल, असं सांगण्यात आलं होतं. मला केवळ १६ दिवसांचंच प्राथमिक प्रशिक्षण देण्यात आलं होतं. त्यानंतर १ ऑक्टोबर रोजी मला युद्धाच्या मोर्चावर पाठवण्यात आलं. तिथे गेल्यावर माझा कमांडरसोबत वाद झाला. त्यानंतर मी आत्मसमर्पण करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, हुसेन याने भीती आणि थकव्यामुळे आत्मसमर्पण केल्याचे युक्रेनी सैन्याने सांगितले.