Red Fort Blast: दिल्लीतील स्फोट प्रकरणात आणखी चार प्रमुख आरोपींना अटक, एनआयएची मोठी कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2025 16:58 IST2025-11-20T16:56:29+5:302025-11-20T16:58:09+5:30
NIA Delh Blast: दिल्लीतील लाल किल्ला परिसरात झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणी एनआयए आणि इतर तपास यंत्रणांचं धाडसत्र सुरूच असून, एनआयएच्या तपासाला मोठं यश मिळालं आहे. एनआयएने या घटनेशी संबंधित चार प्रमुख संशियतांना अटक केली आहे.

Red Fort Blast: दिल्लीतील स्फोट प्रकरणात आणखी चार प्रमुख आरोपींना अटक, एनआयएची मोठी कारवाई
राजधानी दिल्लीत १३ जणांचे बळी घेणाऱ्या बॉम्बस्फोट प्रकरणी एनआयएने मोठी कारवाई केली आहे. विविध राज्यातील पोलिसांना सोबत घेऊन तपास करत असलेल्या एनआयएने चार प्रमुख संशियत आरोपींना अटक केली आहे. त्यामुळे या प्रकरणी अटक करण्यात आल्याचा आकडा वाढला आहे.
अल फलाह विद्यापीठातील २०० पेक्षा जास्त डॉक्टर तपास यंत्रणांच्या रडारवर आहेत. या विद्यापीठातील कर्मचाऱ्यांची पोलीस आणि एनआयएच्या संयुक्त पथकाकडून चौकशी केली जात आहे. ज्या दिवशी दिल्लीत स्फोट झाला, त्याच दिवशी अनेक डॉक्टर विद्यापीठ सोडून गेल्याची माहितीही समोर आली आहे. त्यामुळे सध्या तपास यंत्रणा त्यांचा शोध घेत आहेत.
एनआयएने ज्यांना अटक केली आहे. त्यांना दिल्लीतील पटियाला हाऊस न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना कोठडी सुनावली आहे. एनआयएच्या सूत्रांनी सांगितले की, आतापर्यंतच्या तपासात अटक करण्यात आलेल्या चारही संशयित आरोपींचा दिल्लीत स्फोट घडवून आणण्याच्या कटात महत्त्वाचा सहभाग होता. यापूर्वी एनआयएने आमिर रशीद आणि जासिर बिलाल यांना अटक केली होती.
वृत्तपत्राच्या कार्यालयात AK47 ची काडतुसे
जम्मू काश्मीरच्या पोलीस विभागाच्या राज्य तपास यंत्रणेनं गुरुवारी (२० नोव्हेंबर) काश्मीर टाइम्स वृत्तपत्राच्या जम्मू मधील कार्यालयावर धाड टाकली.
काश्मीर टाइम्समधून देशविरोधी कृत्य करण्याला प्रोत्साहन दिले जात असल्याच्या आरोपानंतर ही धाड टाकण्यात आली. पथकाला वृत्तपत्राच्या कार्यालयात एके४७ रायफल्ससाठी वापरली जाणारी जिवंत काडतुसे मिळाली. त्याचबरोबर पिस्तुल राऊंड्स आणि तीन ग्रेनेड मिळाली आहेत.
काश्मीर टाइम्सच्या कार्यकारी संपादक अनुराधा भसीन यांच्याविरोधात देशाच्या सार्वभौमत्वाला धोका निर्माण केल्याबद्दल आणि एकात्मेतला तडा जाईल असे कृत्य केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.