बंडखोरांना ५ वर्षे निवडणूकबंदी करावी; ज्येष्ठ काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांचे मत
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2020 06:22 IST2020-07-19T23:04:07+5:302020-07-20T06:22:53+5:30
पायलट व भाजप यांना अप्रत्यक्ष कोपरखळ्या मारत सिब्बल यांनी लिहिले: लशीची गरज आहे.

बंडखोरांना ५ वर्षे निवडणूकबंदी करावी; ज्येष्ठ काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांचे मत
नवी दिल्ली : निवडणुकीत मतदारांचा बहुमताचा पाठिंबा मिळवून सत्तेवर आलेले सरकार पाडण्यासाठी बंडखोरी करणाऱ्या लोकप्रतिनिधींना पाच वर्षे कोणतीही निवडणूक लढविण्यास व कोणतेही सार्वजनिक पद धारण करण्यास बंदी घालावी, असे मत काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांनी रविवारी व्यक्त केले.
सचिन पायलट यांनी १८ आमदारांसह गेहलोत सरकारविरुद्ध केलेले बंड व यास भाजपची असलेली कथित फूस यामुळे राजस्थानमधील काँग्रेस सरकार सध्या अस्थिरतेच्या अवस्थेत आहे. या पार्श्वभूमीवर ट्विट करून सिब्बल यांनी हे मत माडले.
पायलट व भाजप यांना अप्रत्यक्ष कोपरखळ्या मारत सिब्बल यांनी लिहिले: लशीची गरज आहे. भ्रष्ट मार्गांचा अवलंब करून लोकनियुक्त सरकारे पाडण्याचा विषाणू वुहानच्या धर्तीवर दिल्लीतही शिरला आहे. त्याला अटकाव करण्यासाठी राज्यघटनेच्या १० व्या परिशिष्टात (पक्षांतरबंदी कायदा) दुरुस्ती करणे आणि अशी बंडखोरी करणाऱ्या सर्वांना निवडणूक लढण्यास किंवा कोणत्याही सार्वजनिक पदावर राहण्यास पाच वर्षे बंदी घालणे हाच रामबाण उपाय आहे.
आपण भाजपमध्ये जाणार नाही, असे पायलट यांनी गुरुवारी म्हटल्यावर सिब्बल यांनी लगेच त्यांना उद्देशून ट्विट केले होते की, तुमच्या ‘घर वापसी’चे काय झाले व राजस्थानचे बंडखोर आमदार भगव्या पक्षाच्या (भाजप) देखरेखीखाली हरियाणात सहलीला गेले आहेत की काय?