Ranya Rao Case: सोन्याची तस्करी केल्याप्रकरणी बंगळुरुमध्ये तुरुंगवास भोगत असलेली कन्नड चित्रपट अभिनेत्री रान्या राव हिला महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) १०२ कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. मंगळवारी डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी बंगळुरू मध्यवर्ती कारागृहात कैद असलेल्या रान्या रावला २,५०० पानांची सविस्तर नोटीस सोपवली.
३ मार्च रोजी दुबईहून परतणाऱ्या रान्याला बंगळुरू विमानतळावर अटक करण्यात आली, तेव्हा हे सोने तस्करीचे प्रकरण प्रकाशझोतात आले. झडतीदरम्यान तिच्याकडून १४.८ किलो सोने जप्त करण्यात आले. सोने जप्त झाल्यानंतर लगेचच तिला ताब्यात घेऊन तुरुंगात पाठवण्यात आले. या प्रकरणात केवळ रान्यावरच नव्हे, तर आणखी तीन आरोपींवरही कारवाई करण्यात आली आहे. या तिघांवर ५० कोटी रुपयांपेक्षा जास्त दंड ठोठावण्यात आला आहे.
रान्या राव ही पोलीस महासंचालक दर्जाचे अधिकारी के. रामचंद्र राव यांची सावत्र मुलगी असल्याचे उघडकीस आल्यानंतर या प्रकरणात खळबळ उडाली. गेल्या वर्षभरात रान्याने ३० वेळा दुबईला प्रवास केल्याचेही तपासात समोर आले आहे. त्यापैकी तिने फक्त १५ दिवसांत चार वेळा दुबईला भेट दिली. या प्रवासांदरम्यान तिने अनेक किलो सोने भारतात आणण्याचे काम केले होते.
त्यानंतर जुलैमध्ये रान्या रावला परकीय चलन संवर्धन आणि तस्करी प्रतिबंधक कायद्याअंतर्गत (COFEPOSA) एक वर्ष तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली. दरम्यान, मंगळवारी झालेल्या सुनावणीत उच्च न्यायालयाने पुढील तारीख ११ सप्टेंबर निश्चित केली आहे. डीआरआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एजन्सी या प्रकरणाची सखोल चौकशी करत आहे.